आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरच्या नगरसेवकांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - नुकत्याच पार पडलेल्या जामनेर पालिका निवडणुकीत बहुमत मिळालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान शहर विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली. भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या काही नियमबाह्य कामांची बिले थांबविण्याची विनंतीही त्यांनी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन देत काही विकासकामांच्या सूचना केल्या.

जामनेर पालिकेत झालेल्या सत्तांतरानंतर आघाडीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व अन्य अशा 20 ते 25 जणांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईला मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव देवकर, नगरविकासमंत्री भास्कर जाधव, उद्योगमंत्री नारायण राणे, कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील, हसन मुर्शीफ, आसिफ नसीम खान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आदींच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शहराच्या समस्या सांगून विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सर्व नगरसेवकांनी सांगितले. भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या काही नियमबाह्य कामांचाही पाढा वाचून अशा कामांची बिले थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांना सूचना करण्याचीही विनंती केली. नगरसेवकांची तक्रार पहाता पवार यांनी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर व मुख्याधिकारी सतीश दिघे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक त्या सूचना केल्या. नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्यांकडे असून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही आपापल्यापरीने जास्तीत जास्त निधी मिळवावा, अशाही सूचना पवार यांनी केल्या.
यांचा होता सहभाग

मंत्र्यांच्या भेटी घ्यावयास गेलेल्या नगरसेवकांमध्ये पारस ललवाणी, मथुरा बेनाडे, शंकर बेनाडे, शोभा धुमाळ, जावेद इक्बाल अब्दुल रशीद, शेख गफ्फार, राजेंद्र भोईटे, अशोक नेरकर, मुकुंदा सुरवाडे, अनिल बोहरा, प्रा. शरद पाटील, रूपेश चिप्पड या नगरसेवकांसह नेते संजय गरुड, ईश्वर धारिवाल, जोत्स्ना विसपुते आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

विकासकामांबाबत मार्गदर्शन लाभले
पालिका निवडणुकीतील विजयानंतर मुंबईला जाऊन मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. विकासकामांबाबत चर्चा करून निधीची मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी एक तास वेळ देऊन विकासकामांबाबत मार्गदर्शन केले. प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनीही शहर विकासासाठी नेत्यांकडून निधी मिळवावा, अशा सूचना केल्या. प्रा. शरद पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
उपमुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आला होता. निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगून विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत व नियमबाह्य कामे न करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. सतीश दिघे, मुख्याधिकारी, जामनेर