आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जननी शिशू सुरक्षा योजनेतील खासगी वाहनांची सेवा बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एप्रिल 2013 पासून राज्य शासनानतर्फे जननी शिशू सुरक्षा अभियान राबवण्यात आले होते. या योजनेनुसार गरोदर मातांना घरापासून रुग्णालयापर्यंत आणि रुग्णालयातून घरी पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर खासगी वाहने भाडेतत्त्वावर लावण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील गरोदर मातांनाही वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळत होती. मात्र, आरोग्य विभागाने अवघ्या नऊ महिन्यांतच ही योजना गुंडाळल्याने गरोदर मातांना आता स्वखर्चाने रुग्णालय गाठावे लागणार आहे.

आरोग्य विभागातील शासकीय रुग्णवाहिकांची स्थिती आणि कामाचा ताण लक्षात घेऊन, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खासगी वाहने भाडेतत्त्वावर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाद्वारे, जिल्ह्यासाठी 13 खासगी वाहने वर्षभराचा करार करून भाडेतत्त्वावर लावण्यात आली होती. गेल्या आर्थिक वर्षापासून सुरू झालेल्या या योजनेचा ग्रामीण भागातील गरोदर मातांना लाभ मिळत होता. ही सेवा 24 तास उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात प्रवासी वाहनांच्या कमतरतेमुळे ऐनवेळी होणारी गैरसोय टाळता येत होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 31 जानेवारीला सर्व खासगी वाहनांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी वाहनांऐवजी शासकीय वाहनांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय वाहनांची झालेली दुरवस्था आणि चालकांची अनुपस्थिती यामुळे गरोदर मातांना आता मात्र अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

रुग्णालयांचे चालक मुख्यालयी थांबत नसल्याने वेळप्रसंगी रुग्णांना खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागतो. 24 तास सेवा बजावण्यासाठी मुख्यालयी थांबण्याची सक्ती आहे.

सूचना दिली
खासगी वाहनांची सेवा बंद करण्याबाबत जिल्हा परिषदेचे पत्र 31 जानेवारीला प्राप्त झाले आहे. 1 फेब्रुवारीपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव खुर्द, किन्ही आणि कठोरा खुर्द येथील शासकीय वाहनचालकांना 24 तास सेवा बजावण्याची सूचना दिली आहे. डॉ.पी.बी. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, भुसावळ

पालिकेची गैरसोय
जननी शिशू सुरक्षा योजनेचा सर्वाधिक लाभ पालिकेच्या रुग्णालयात येणार्‍या गरोदर मातांना होत असे. महिन्याकाठी साधारणपणे 50 लाभार्थ्यांना 24 तास या सेवेचा लाभ मिळत होता. मात्र 1 फेब्रुवारीपासून खासगी वाहनांची सेवा बंद झाल्याने पालिका रुग्णालयात येणार्‍या गरोदर मातांना खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागणार आहे.