आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेच्या ताब्यातील भूखंडाची फाइल ‘ओपन’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रिंग रोडवरील जिल्हा बॅँकेच्या मुख्यालयासमोरील गार्डन व मोकळी जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. बाजारभावानुसार 6 कोटींपेक्षा जास्त किमतीची ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने जुनी फाइल पुन्हा ‘ओपन’ केली आहे. याप्रकरणी तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बजावलेल्या नोटिशीच्या अनुषंगाने नगररचना विभागाने ती जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, बॅँक व्यवस्थापनाला लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे.

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या रिंग रोडवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे मुख्यालय असून, या ठिकाणी बॅँकेची मोठी वास्तू आहे. बॅँकेने बांधलेली इमारत स्वत:च्या जागेत असली तरी, रिंग रोडकडून प्रवेश असलेली 4467 चौरस फूट जागा पालिकेच्या मालकीची असून, त्या परिसरातील नागरिकांसाठी ‘ओपन स्पेस’ म्हणून त्याचे आरक्षण असल्याची नोंद पालिकेच्या दप्तरी आहे. विशेष म्हणजे, बॅँकेला रिंग रोडकडून अ‍ॅक्सेस नसून, पूर्वेकडे (बॅँक सभागृह) जाणा-या9 मीटर रुंदीच्या रस्त्यावरून प्रवेशद्वार आहे. मात्र, बॅँकेने ही मोकळी जागा प्लॉटमध्ये एकत्र करून रिंग रोडवरून प्रवेश घेतला आहे. तसेच बगिचा तयार करून भव्य शिल्पही उभारले आहे.

डॉ.गेडाम यांनी दिली होती नोटीस
या जागेसंदर्भात 10 एप्रिल 2006 रोजी तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी बॅँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे. त्यात मुंबई प्रांतिक अधिनियम 1949च्या कलम 81 ‘ब’ अन्वये जागा ताब्यात का घेऊ नये? तसेच नगररचनाच्या कलम 51 अन्वये दिलेल्या बांधकाम परवानगीत फेरबदल का करण्यात येऊ नये? असे नमूद केले आहे.

सहा कोटींची जागा
जिल्हा बॅँकेच्या ताब्यात असलेली पालिकेच्या मालकीची सुमारे 6 कोटी रुपयांची ही जागा 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून आहे. ती जागा ‘ओपन स्पेस’ म्हणून राखीव असल्याने ताब्यात घेण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे डॉ.गेडाम यांनी बजावलेल्या नोटिशीच्या अनुषंगाने याप्रकरणी बॅँकेला पुन्हा नोटीस बजावण्यात येणार आहे.

बॅँकेकडे मालमत्ता तारण
बॅँकेकडील कर्जापोटी करण्यात आलेल्या ‘वनटाइम सेटलमेंट’ आणि ‘रिशेड्युलिंग’नुसार सन 2019पर्यंत कर्ज फेडण्याची मुदत आहे. या कर्जापोटी बॅँकेने सरदार वल्लभभाई टॉवर आणि गोलाणी मार्केट तारण म्हणून घेतले आहे. एकीकडे कर्जापोटी बॅँकेकडे सतरामजली तारण आहे, तर दुसरीकडे बॅँक पालिकेच्या मालकीची जागा फुकटात वापरत असल्याचा सूर निघत आहे.

59 कोटी 34 लाख घेतले होते कर्ज
पालिकेने जिल्हा बॅँकेकडून सन 1997 ते 2001 या कालावधीत 59 कोटी 34 लाख कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 1997 ते 2008 असा होता. या कालावधीत पालिकेने 3 कोटी 93 लाख 90 हजार फेडले होते. त्यानंतर डिसेंबर 2008अखेर मुद्दलाची रक्कम 55 कोटी 40 लाख 10 हजार असून, व्याजाची रक्कम 14 कोटी 58 लाख 40 हजार 704 रुपये होती. रिसेटिंगनंतर 48 कोटी 47 लाख 12 हजार 701 रुपये कर्जाची रक्कम शिल्लक आहे. आतापर्यंत महापालिकेने 115 कोटी 84 लाख 95 हजार 996 रुपयांपेक्षा जास्त कर्ज फेडले आहे.