आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात येत असलेली शहर बससेवा नाकारून पालिकेने तीन वर्षांपूर्वी मक्तेदारामार्फत स्वत:ची अंतर्गत वाहतूक सेवा सुरू केली होती; मात्र प्रवासी मिळत नसल्याचे कारण पुढे करत मक्तेदाराकडून ही सेवा गुंडाळण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
महापालिका हद्दीत राज्य परिवहन महामंडळातर्फे शहर बससेवा पुरवण्यात येत होती. राज्यातील अन्य महानगरांमध्ये स्वत:ची सेवा दिली जात असल्याचे पाहून राज्य परिवहन महामंडळाची सेवा नाकारून जळगाव मनपाने स्वत:ची ‘जेएमटीयू’ (जळगाव म्युनिसिपल ट्रॅव्हल्स युटीलिटी) सुरू केली. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी ‘साई सेवा सर्व्हिसेस’ या एजन्सीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2010 रोजी 24 आसनक्षमता असलेल्या 25 बसेस शहरात सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला सर्व बसेस सुरळीतपणे धावत होत्या; मात्र नंतर प्रवासी मिळत नसल्याची ओरड करत मक्तेदारामार्फत सहा-सात महिन्यांपूर्वी 10 गाड्या धुळे येथे पाठवण्यात आल्या. तसेच उरलेल्या 15पैकी पाच गाड्या महिनाभरापूर्वी इंदूरला पाठवण्यात आल्या होत्या. आता उर्वरीत बसेसही इंदूरला पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
चालकांनी हाणून पाडला प्रयत्न
पाच गाड्या इंदूरला नेण्यासाठी (क्र.एमपी-09/सी-5922) या कारमधून काही मंडळी जळगावात दाखल झाली होती. मक्तेदाराच्या व्यवस्थापकाने पाच गाड्या खान्देश मिल कॉम्प्लेक्स आवारात जमा करण्याचे चालकांना सांगितले होते. ही गोष्ट इतर चालकांना समजताच दुपारी 3 वाजता सर्वच गाड्या या ठिकाणी जमा करण्यात येऊन वाहतूक बंद करण्यात आली. तसेच तेथे साई सेवा सर्व्हिसेसचे डेपो मॅनेजर दीपक शिंदे यांनी चालक-वाहकांशी चर्चा केल्याने बसेस नेण्याची प्रक्रिया पुढे सरकू शकली नाही.
मक्तेदाराने बोलणे टाळले
याबाबत माहिती घेण्यासाठी साई सेवा सर्व्हिसेसचे संचालक सुनील झवर यांशी संपर्क साधला; मात्र आपण मुंबईत रुग्णालयाच्या कामासाठी आलो असून, शहर बससेवेविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सायंकाळी पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. तसेच परिवहन समिती सभापती महेंद्र जैन यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनीही फोन उचलला नाही.
परिवहन समिती नावाला
जेएमटीयूच्या सेवेवर लक्ष ठेवून समन्वय ठेवण्यासाठी परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या सदस्याला दर महिन्याला 3800 रुपये मानधन देण्याची तरतूद आहे. मक्तेदाराकडून बससंख्या कमी केली जात असताना समितीकडून योग्य पावले उचलणे गरजेचे होते. परिवहनचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार केले जाते. सन 2013-14 साठी 10 लाख 75 हजारांचे अंदाजपत्रक केले होते. पालिकेला साई सेवा सर्व्हिसेसकडून रॉयल्टीपोटी एक लाख 50 हजार रुपये तर डिपॉझिट व्याजातून वर्षाला पाच हजार व अन्य निधी मिळून 10 लाख 75 हजार रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.