आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएमटीयू मार्गांचे सर्वेक्षण होणार; सोनवणेंच्या रिक्त जागी सपकाळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील विविध मार्गावर जेएमटीयू बससेवेची मागणी, प्रतिसाद, नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात प्रशासन, सदस्य आणि मक्तेदाराने मिळून सर्वेक्षण करून याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती रमेश यांनी दिल्या. या सर्व्हेक्षणास प्रशासनातर्फे तयारी दर्शविली आहे. महापालिकेच्या परिवहन समितीच्या सन 2013-14 च्या 10 लाख 75 हजार रुपयाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंगळवारी झालेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.

पालिकेतील 11 व्या मजल्यावरील परिवहन समिती सभापतींच्या दालनात झालेल्या बैठकीस सभापती महेंद्र जैन, स्थायी समिती सभापती रमेश जैन, गटनेते नितीन लढ्ढा, प्रकल्प अधिकारी एस.जे.बोरोले, वाहन विभाग प्रमुख जयंत नेहते, साई सेवा सर्व्हिसेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष बैठकीत सदस्यांना अंदाजपत्रकाच्या प्रती वाटप न करण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. रमेश जैन यांनी या वेळी सांगितले की, परिवहन सदस्य, मक्तेदाराचे प्रतिनिधी, पालिकेतील संबंधित अधिकारी यांचे दूरध्वनी खुले करण्यात आल्यास काही तक्रारी किंवा अडचणी असल्यास त्यावर तोडगा काढणे शक्य होईल. शहरातील बहुतांश मार्गांवर बस धावत नाही, नागरिकांची मागणी असलेल्या भागात बस गेल्यास उत्पन्नात वाढ होईल, त्यामुळे यादृष्टीने संयुक्त सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अंदाजपत्रकास मंजुरी
बैठकीत सन 2012-13 या आर्थिक वर्षातील दुरुस्त अंदाजपत्रकासह सन 2013-14 चे प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. पालिकेतर्फे अंशदान रक्कम म्हणून 7 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. जेएमटीयूमक्तेदाराकडून रॉयल्टीपोटी 1 लाख 50 हजार, डिपॉझिटमधून वर्षाला 5 हजार रुपये व अन्य बाबीतून मिळून 10 लाख 75 हजार रुपये उपलब्ध होणार असून यातून वर्षभरात सदस्यांचे मानधन, संगणक व करण्यात येणारा प्रशासकीय खर्च अंदाजपत्रकात नमूद आहे. या अंदाजपत्रकास सदस्यांनी मंजुरी दिली असून स्थायी समिती समोर सादर करण्यात येणार आहे.

सोनवणेंच्या रिक्त जागी सपकाळे
महापालिकेच्या प्रभाग समिती चारचे सभापती विनायक सोनवणे यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने शहर विकास आघाडीचे नगरसेवक मिलिंद कोंडू सपकाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर घोषित केले. मंगळवारी सकाळी 10 वाजता यासाठी निवड सभेचे आयोजन केले होते. या वेळी महापौर जयर्शी धांडे, उपमहापौर राखी धांडे, उपायुक्त भालचंद्र बेहरे, नगरसचिव गोपाल ओझा आदी उपस्थित होते.