आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jobs Opportunities For Young People To Get An Industry Extension

उद्योग विस्ताराने तरुणांना मिळणार रोजगाराची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अखंडित वीजपुरवठा, रस्ते, भविष्याच्या दृष्टीने लगतच असलेले विमानतळ, भुसावळ आणि औरंगाबाद अशा दोन्ही दिशांकडे दळणवळणाची सुविधा उमाळा- नशिराबाद रस्त्याच्या लगत आहे. त्यामुळे उद्योग विस्ताराच्या तयारीत असलेले सुमारे ४० ते ५० उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. तसेच शासनस्तरावरून ‘को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री सेक्टर’ला मान्यतेसाठी हालचाली आहेत. येथील उद्योग विस्ताराने नव्याने ८०० ते १००० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
महापालिका हद्दीत तसेच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्लास्टिक इतर काही उद्योजकांना उद्योग विस्तार करायचा आहे. मात्र, आहे त्याला लागून प्लॉट मिळत नसल्याने इच्छा असूनही त्यांना विस्तार करता येत नसल्याची स्थिती आहे. यासह इतर सुविधांची वानवा असल्याने उद्योग विस्तारासाठी धडपडणाऱ्या उद्योजकांकडून तसेच काही नवउद्यॉजकांकडून उमाळा ते नशिराबाददरम्यान विमानतळालगत जमिनी खरेदी केल्या आहेत. शासनस्तरावरून ‘को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री सेक्टर’ला मान्यतेच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्याअंतर्गत सुमारे २५ ते ३० उद्योगांना प्लॉट उपलब्ध होतील.
सध्या या परिसरात अखंड वीजपुरवठा, दळणवळणाची सुविधा, जवळील कामगार वर्ग, असे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. महापालिका प्रशासनाने पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे.
स्थलांतरण नव्हे विस्तारीकरण
- एमआयडीसीत उद्योग सुरू असलेल्यांची मुले मोठी झाली आहेत. त्यांना नवीन उद्योग सुरू करायचे आहेत. काही छोट्या उद्योजकांना विस्तार करायचा आहे. याव्यतिरिक्त ‘को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्री सेक्टर’मुळे बाहेरची काही मंडळी येथे येऊ शकते. त्यामुळे नवीन रोजगारही उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होईल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही ही बाब सकारात्मक घेऊन सहकार्य करावे, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे.
अंजनी कुमार मुंदडा, प्रांत अध्यक्ष, लघुउद्योग भारत
उद्योगासाठी पाण्याची उपलब्धता झाल्यास वर्षभरात चित्र पालटणार
या ठिकाणी उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असलेल्यांना पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. यासाठी लघुउद्योग भारतीच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करून तो महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, पालिका आणि आवश्यक त्या प्राधिकरणासमोर लवकरच सादर केला जाणार आहे. पाणी उपलब्ध झाल्यास दिवाळीपासून येथे उद्योगांची पायाभरणी करण्याची तयारी उद्योजकांनी ठेवली आहे.
उद्योग विस्तारासाठी उद्योजक उत्सुक
अशोक बोरोले, संजय तापडिया, अंजनीकुमार मुंदडा, पुरुषोत्तम न्याती, राजीव बियाणी, सचिन लढ्ढा, मयूर देवरे, पुरुषोत्तम माधवानी, रवी लढ्ढा, प्रमोद संचेती, प्रकाश मुंदडा यांच्यासह इतरही उद्योजक या ठिकाणी उद्योग विस्तारासाठी उत्सुक आहेत. यापैकी काहींनी यासाठी जमिनीत गुंतवणूक केली असून काहींची गुंतवणूक करण्याची तयारी आहे.