आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी घेतल्याप्रकरणी रावेरच्या पत्रकारास कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर- विरोधातील वृत्तमालिका थांबवण्यासाठी 50 हजारांची खंडणी स्वीकारल्याप्रकरणी रावेरातील पत्रकार प्रवीण प्रभाकर पाटील याला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

प्राथमिक शिक्षक व स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष रवींद्र राजाराम पवार यांच्या विरोधात प्रवीण पाटीलने एका वर्तमानपत्रातून वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. वृत्तमालिका थांबवण्यासाठी पाटील याने पवार यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. शेवटी एक लाखात तडजोड झाल्यानंतर त्याचा पहिला हप्ता म्हणून पवार यांनी 50 हजारांची रोकड पाटीलला दिली.

बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पाटील याच्या श्री गणेश फोटो स्टुडिओत हा व्यवहार झाला. त्यानंतर लागलीच पोलिसांनी स्टुडिओवर धाड टाकत रोकडसह त्याला ताब्यात घेतले. गुरुवारी पत्रकार पाटीलला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश पवन बनसोड यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. पोलिस निरीक्षक अनिल आकडे तपास करत आहेत. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर प्रवीण पाटील याच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. तो म्हणाला की, पवार यांच्याकडून वृत्तमालिका थांबवण्यासाठी पैशांचे आमिष दाखवण्यात आले होते. मी त्यांच्याकडे कधीही पैशांची मागणी केली नाही. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मी पवार यांच्याशी संपर्क साधला नाही. तसेच पैसे स्वीकारत नाही; हे ओळखून त्यांनीच स्टुडिओत 50 हजारांची रक्कम ठेवली आणि मला या प्रकरणात गोवले.