आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judicial Custody On Eight Ruffian Issue At Dhule, Divya Marathi

आठ गुंडांवर प्रथमच मोक्काची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातून धिंड काढण्यात आलेल्या आठ गुंडांवर संघटित गुन्हेगारी अर्थात मोक्काअंतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. हे टोळके गेल्या काही वर्षांपासून शहराच्या शांततेला बाधक ठरले होते. बंटी उर्फ रामदास पपय्या हा टोळक्याचा म्होरक्या आहे. मोक्काअंतर्गत कारवाई होण्याची धुळयाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
शहरातील विशेषत: मिल परिसर व चितोडरोड भागात संघटित गुन्हेगारीने दहशत निर्माण करणार्‍या टोळक्याला पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला आहे. या टोळक्यात बंटी उर्फ रामदास पपय्या (26), मिलिंद राजेंद्र आवटे (25), निखिल नारायण भाबड (19), राकेश अशोक पाटील (21), मयूर मच्छिंद्र शादरूल (25, सर्व रा. रेल्वेस्थानकरोड, धुळे), पप्पू उर्फ दत्तात्रय हिंमत निकम (25, रा. कोळवलेनगर, धुळे), महेश सुरेश चौधरी (26, रा. मोहाडी, धुळे) आणि गण्या मुंबई नामक तरुण यांचा समावेश आहे. त्यापैकी गण्या हा अजूनही फरार आहे. या टोळक्यावर गंभीर स्वरूपाचे सुमारे 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये लूट, खंडणीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. होळीच्या एक दिवसापूर्वी या टोळक्याविरुद्ध काही नागरिकांनी तक्रार दिली होती. त्यापैकी तुषार रावण नवले (29) यांच्या तक्रारीवरून या टोळीवर लूट, खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर धुळे शहर पोलिसांनी या टोळक्याची धिंड काढून त्यांची मस्ती जिरविली होती. याच गुन्ह्यात पोलिस प्रशासनाने वाढीव कलम लावून सर्व संशयितांवर मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 चे कलम 3(1)(2),3(2),3(4) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळक्यावर मोक्कानुसार कारवाईसाठी पोलिस प्रशासनाने नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला प्रशासनाने परवानगी दिली. शहरात पाच वर्षांपूर्वी एका गुंडाला पोलिस निरीक्षकाने एन्काउंटरमध्ये ठार केले होते. त्यानंतर पोलिसांकडून गुन्हेगारांवर कडक कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक चौकांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. गुंड हैदोस घालत असताना नागरिक मात्र बचावाच्या पवित्र्यात असतात.
काय आहे मोक्का
मोक्काअंतर्गत कारवाई झाल्यावर किमान सहा महिने जामीन देण्याची तरतूद नाही. सहा महिन्यांत संबंधितांवर दोषारोपपत्र दाखल करावे लागते. सीआरपीसी 164 नुसार कबुली जबाब घेण्याचा अधिकार हा एसपी दर्जाच्या अधिकार्‍याला असतो. मोक्का लावण्याची परवानगी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी देतात. संघटित गुन्हेगारीसाठी सल्ला-चिथावणी देणे अथवा मदत करण्यावरही मोक्का लागू शकतो. टोळक्याने संघटित गुन्ह्यातून जमविलेली संपत्तीही जप्त होते. कायद्यानुसार अशा गुन्ह्यामध्ये जन्मठेप व किमान पाच लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
अजून दोन प्रस्ताव..
पोलिस प्रशासनाचे हे धाडसी प्रयत्न एवढय़ावरच थांबलेले नाही. शहरातील आणखी दोन जणांचा मोक्कासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
क्राइमचे लोण वाढले
नाशिक, मुंबई या शहरांमध्ये घडणार्‍या गुन्हेगारीशी साधम्र्य असलेले गुन्हे धुळे शहरात घडायला लागले आहेत. यामागे स्थानिक गुंडच असतात. मोटारसायकली जाळण्याचे प्रकार बाहेरूनच शहरात आले आहेत.
कौतुकास्पद प्रयत्न..
पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी, धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक र्शावण सोनवणे, उपनिरीक्षक व्ही.डी. पवार, अमृत ठाकरे, युवराज सूर्यवंशी, कैलास जोहरे, जावरे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांच्या या प्रयत्नांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
भयमुक्त होऊन नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे आले पाहिजे. बर्‍याचदा अशा टोळीच्या दहशतीपोटी कोणी पुढे येत नाही. शहरातील अशा काही जणांवर मोक्कानुसार कारवाईसाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी, धुळे