आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jungal's Widelife Animals Scattered For The Water

जंगलातील वन्यप्राण्यांचा पाण्‍यासाठी भटकंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - तापीनदीच्या पात्राजवळच असलेल्या जुगादेवी जंगल परिसरात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शिकारीचा धोका आणि गौणखनिज तस्कारांचा रात्रंदिवस वावर असल्याने वन्यप्राणी नदीपात्राकडे जाणे टाळतात. अशा बिकट स्थितीत जुगादेवी मंदिराजवळील पाण्याचा हौद वन्यप्राण्यांसाठी संजीवनी ठरत आहे. दरम्यान पाणवठा निर्मितीची दिवास्वप्न कायम असून वनविभागाने या भागात वनबंधारा उभारावा, अशी मागणीही समोर आली आहे.

अत्यल्प पावसामुळे जुगादेवी जंगलात पाण्याचा ठणठणाट आहे. वन्यप्राण्यांसाठी उन्हाळय़ातील पाण्याचा स्त्रोत असलेला पाणवठाही कोरडाठाक झाला आहे. तापीचे विस्तीर्ण पात्र आणि मुबलक पाणी असतानाही वन्य प्राणी पाण्यासाठी नदीपात्राकडे जात नाहीत. केवळ गौणखनिज तस्करांचा वाढलेला वावर आणि नदीपात्रात होणारे भूसुरुंगाचे स्फोट, जेसीबी मशीनचा आवाज यामुळे प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जुगादेवी मंदिराच्या परिसरात असलेल्या हौदात पाणी उपलब्ध असल्याने रानडुकरे, मोर, ससे यांच्यासह इतर प्राणीदेखील या छोट्याशा हौदात असलेल्या पाण्याने तहान भागवतात. जुगादेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या झर्‍यातूनही पाणी मिळते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागातही शिकारीचे प्रकार वाढले आहेत. एकेकाळी पाण्याचे अनेक स्त्रोत असलेला हा भाग आता ओसाड होण्याच्या मार्गावर आहे. वनविभागासह शहरातील दानशूर मंडळींनी मंदिराच्या बाजूला असलेल्या दरीत वनबंधारा उभारल्यास येथे वर्षभर पाणी टिकवून ठेवणे शक्य आहे. कृत्रिम पाणवठय़ांच्या निर्मितीसाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला पाहिजे.


वनविभागाने बंधारा बांधला पाहिजे
जुगादेवी मंदिराच्या समोर हौदात पाणी भरून ठेवले जाते. वन्यप्राण्यांना सध्या या पाण्याचा आसरा मिळतो. मंदिराच्या शेजारीच बंधार्‍याची निर्मिती झाल्यास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे पर्यटनस्थळ म्हणूनही जुगादेवीचा विकास होईल. वन्यप्राण्यांना संरक्षण देण्यासाठी हा प्रयत्न फलदायी ठरेल. विजय करोसिया, पुजारी, जुगादेवी मंदिर, भुसावळ


खोलगट दरीतील झर्‍याची होतेय मदत
प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून एका दरीतील झर्‍याची पर्यावरणप्रेमींनी स्वच्छता केली. यातून आता बर्‍यापैकी पाणी मिळत आहे. मानवी वावर वाढल्याने या ठिकाणी दिवसा पशू-पक्षी पाणी पिण्यासाठी येत नाहीत. रात्री या झर्‍याचा प्राण्यांना उपयोग होतो. गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर वाहणारा हा झरा पशुपक्ष्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. सतीश कांबळे, पर्यावरणप्रेमी, भुसावळ