आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचे सोने खरेदी करणारा व्यापारीही कायद्याने गुन्हेगारच

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रेल्वेतील चोरट्याने दिलेल्या माहितीवरून आर.एल.ज्वेल्समध्ये 120 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आल्यानंतर सराफी व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चोरी करणे जसा गुन्हा आहे तसेच चोरीचे सोने आहे, हे माहित असूनही ते खरेदी करणे हा देखील गुन्हाच आहे; परंतु चोरीच्या वस्तू अनावधानानेदेखील खरेदी होऊ शकतात. पोलिस चौकशीत ते निष्पन्न होणे गरजेचे असते.
तीन वर्षे शिक्षेची तरतूद
चोरी करणे ज्याप्रमाणे गुन्हा आहे. तसेच चोरीचा माल खरेदी करणेही गुन्हा आहे. यासंदर्भात भारतीय दंड विधानाच्या कलम 411 मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यात कलम 411 अन्वये कोणतीही चोरीची मालमत्ता, ती चोरीची आहे हे माहित असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना जो कोणी अप्रामाणिकपणाने ती स्वीकारील किंवा ठेवून घेईल, त्याला तीन वर्ष मुदतीची कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्य दंडाच्या शिक्षा होतील.
गुन्हा जामीनपात्र करण्याची मागणी अजूनही काय- सोन्याच्या दुकानात येणारा ग्राहक हा चोरीचे सोने मोडण्यासाठी आला आहे, हे ओळखणे कठीण असते. काही वेळेस व्यापार्‍यांचीही दिशाभूल होऊन व्यवहार होऊ शकतो; परंतु त्यानंतर होणार्‍या कारवाईमुळे प्रतिष्ठेला धक्का बसतो. त्यामुळे चौकशी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कायद्यानुसार कलम 411 हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात बदल करून गुन्हा जामीनपात्र करण्याची मागणी यापूर्वीही केली असून आजही कायम आहे.विलास बाविस्कर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सुवर्णकार संघ
वर्माला झाली होती तत्काळ अटक - जिल्हा रुग्णालयातील डॉ. विजया चौधरी यांची सोन्यासाठी हत्या झाली होती. त्यातील आरोपी युवराज साबळे याने चोरीचे सोने सराफ बाजारातील दुकानदार महेशकुमार वर्मा याला विकले होते. साबळेने तपासात माहिती देताच पोलिसांनी वर्माला कलम 411 नुसार अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत आहे.
पिता-पुत्रास ताब्यात घ्यावे
- चोरीचे सोने राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन व आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या आरएल ज्वेल्स या दुकानात विकले गेले. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावे, अशी मागणी भाजपच्या जळगाव महानगर शाखेने उपजिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. सामान्य व्यापार्‍यासाठी जो कायदा आहे, तोच कायदा सर्वांना लागू आहे. आरएल ज्वेल्समध्ये 20 हजारांच्या वर दागिने मोडल्यास रोख रक्कम न देता चेक पेमेंट दिले जाते. मात्र या चोराला रोख रक्कम दिली गेली आहे.