आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी महापौर करनकाळ, माजी नगराध्यक्ष पवारांच्या घरात कोम्बिंग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - वाद आणि राजकीय कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहणार्‍या शहरातील पवनपुत्र आणि भांग्या मारुती चौकातील तरुणांमध्ये रविवारी दुपारी हाणामारी होऊन दगडफेक झाली. त्यामुळे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी महापौर भगवान करनकाळ आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांचे सर्मथक एकमेकांशी भिडले. त्यानंतर पोलिसांनी घराघरात कोम्बिंग ऑपरेशन करून दंगलखोरांना ‘प्रसाद’ देऊन वाहनात बसविले.

शहरातील गल्ली नं. 6 मधून भांग्या मारुती विजय व्यायामशाळेचे तरुण दुपारी दोन वाजेच्या सुमारास देवीचा मांडव नेत होते. तर पवनपुत्र चौकातील तरुण देवीचा मांडव विसर्जन करून घराकडे परत येत होते. पारोळा रोडवरील पवनपुत्र चौकात दोन्ही गट समोरासमोर आले. त्या वेळी पावसाच्या पाण्यामुळे झालेला चिखल अंगावर उडाल्यामुळे आणि एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून वादाची ठिणगी पडली. परस्परांवर काठय़ा आणि घातक शस्त्रांनी हल्ला चढविण्यात आला. त्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेकीला सुरुवात झाली. पोलिस पथक आल्यानंतरही जमाव नियंत्रणात आला नव्हता. त्यामुळे वाढीव कुमक मागविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत गवळी व पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी हे दाखल झाले. तोपर्यंत गल्लीमध्ये दगड, विटा, फरशी आणि काचेचा खच पडला होता. त्यातून मार्ग काढणे पोलिसांनादेखील कठीण जात होते. अटकसत्र राबविण्यासाठी पोलिस मुख्यालयातून वाढीव कुमक आणि पोलिस व्हॅनही मागविण्यात आली. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून दंगलखोरांना अटक केली. मोठय़ा इमारती, दुकाने, घरे व त्यांच्या छतावर तसेच व्यायामशाळेतही शोध सुरू होता. भगवान करनकाळ, बाजीराव पवार यांच्या घरातही पोलिसांनी दंगलखोरांचा शोध घेतला. तर भीतीच्या सावटाखाली असलेले नागरिक खिडक्या व गॅलरीमधून अटकसत्राची कारवाई पाहत होते. मनपाच्या जुन्या शाळेच्या छतावर, जिन्याखाली, स्वच्छतागृहात तसेच मोठय़ा वाहनांमध्ये लपलेल्या दंगलखोरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. काही ठिकाणी महिलांकडून पोलिसांना विरोध करण्यात आला. त्यामुळे महिला पोलिस कर्मचार्‍यांचे पथकही मागविण्यात आले होते. याचवेळी भांग्या मारुती व्यायामशाळेतून पोलिसांनी गोणीभर रिकाम्या बाटल्या, रॉड जप्त केले. दरम्यान, पोलिस येण्यापूर्वी करनकाळ आणि पवार हे सर्मथकांना शांत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. या दगडफेकीत चार कार व सुमारे सहा मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत अनेक दंगलखोरांना अटक झाली होती. भगवान करनकाळ यांचा मुलगा सिद्धार्थ यालाही ताब्यात घेण्यात आले. घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत आझादनगर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.