आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कथ्थक नृत्यात ‘फ्यूजन’ने आणली रंगत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शास्त्रीय पारंपरिक नृत्य चिरंतन टिकून राहण्याच्या उद्देशाने ‘धिन धिन धा..’ ‘ताक धिन धिन..’ च्या तालावर तराना, धृपद रागासह अनेक रागांवर कथ्थक सादर करण्यात आले. ‘वाचस्पती’ रागावरील ‘फ्यूजन’ने प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवली.

प्रभाकर कला संगीत अकादमीच्या विद्यार्थिनींतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी झालेल्या ‘अनंत’ या कार्यक्रमात कथ्थक या शास्त्रीय नृत्यातील सर्व प्रकार सादर करण्यात आले. आगळय़ावेगळया या उपक्रमातून लोप पावत असलेल्या या कलेला पुन्हा बहर आणला. कार्यक्रमाची सुरुवात ‘अखंड मण्डलाकारम’ या गुरुवंदनेने झाली. धृपद गायन शैलीची अतिप्राचीन ‘तू ही सूर्य तू ही चंद्र’ अंतरा सादर केली. यातून मिर्शित पाच सुरांचे राग सादर केले. दुसर्‍याच कथ्थकला प्रेक्षागृहातून चांगला प्रतिसाद मिळाला. स्वत: डॉ.अपर्णा भट यांनी ‘धिन धिन धा’वर ठेका धरीत कथ्थक नृत्यात बहर आणला. त्यांना गीत-संगीताची साथ लाभली. समारोपात ज्ञानेश्वर कासार यांनी स्वरचित केलेली ‘वाचस्पती राग’ या फ्यूजनची जादू प्रेक्षकांना चांगलीच भावली.

ठुमरी, त्रिवटला प्रतिसाद
पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरांनी अजरामर झालेले ‘बाजे मुरलीया बाजे’यावर कथ्थकातून लय, तालसुरांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यापाठोपाठ ‘ठुमरी’, ‘त्रिवट’ हे राग सादर झाले. त्यानंतर नऊ रागांची ‘रागमाला’ सादर झाली. कथ्थकसाठी ऑक्टोपॅड, तबला व पखवाज या वाद्यांची साथ मिळाली.

गीतासोबत संगीताची साथ
तबल्यावर मनोज कुळकर्णी, तेजस मराठे यांनी साथ दिली. गायन जितेश मराठे, गौरी कुळकर्णी, आनंद मोरे, युगर्शी महाले यांनी तर ऑक्टोपॅड कैलास निकम यांनी साथसंगत दिली. दीड तास चाललेल्या कार्यक्रमातून प्रेक्षकांची उपस्थितीदेखील लक्षणीय होती.

29 विद्यार्थिनींकडून सादरीकरण
प्रभाकर कला संगीत अकादमीच्या 8 ते 18 वयोगटातील 29 विद्यार्थिनींनी कलेचे सादरीकरण केले. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन नाट्यकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते झाले. किरण कासार, डॉ.अपर्णा भट, स्वरांगी माहुरकर, अलका पाटील, रश्मी लखानी, मृणाल सोनवणे, वैदेही पाटील यांच्या उपस्थितीत नटराजपूजन झाले. स्नेहा परशुरामे यांनी सूत्रसंचालन केले. तनया पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला उपस्थितांकडून प्रतिसाद मिळाला.