आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींना उजाळा: जिवापाड जपून ठेवलंय बाबूजींचं अक्षरधन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- कलातपस्वी केकी मूस उर्फ बाबूजींचा 31 डिसेंबर हा स्मृतिदिवस आहे. भुसावळचे कलायात्री विवेक वणीकर यांनी या पार्श्वभूमीवर सोमवारी ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत करताना बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.
वणीकर म्हणाले की, बाबूजींना प्रमुख पाहुणे म्हणून सहकारनगरातील ‘वणीकर स्टुडिओच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी चाळीसगावला 27 ऑक्टोबर 1981 रोजी गेलो होतो. आमचा प्रस्ताव मांडल्यावर ते म्हणाले होते की, ‘मी आता माझ्या कलादालनाच्या मुख्य गेटच्या बाहेरच पडत नाही. कुठलेच निमंत्रण स्वीकारतही नाही. परंतु तू नाराज होऊ नकोस. सदैव स्मरणात राहील, असे एक लेटरपॅड लिहून देतो. ते कायमस्वरुपी आशीर्वाद म्हणून जपून ठेव.’ करसू लिपीतील या पत्राची सुरुवात त्यांनी ‘डीअर दिलीप’ अशी केली आहे. दिलीप हे माझं टोपण नाव. ते फक्त आमच्या परिवारातील जवळच्या व्यक्तींनाच माहीत आहे. मात्र, वडील कै. वसंत वणीकर यांचा बाबूजींशी शिल्पकार राम सुतार यांच्यामुळेच सुरुवातीपासूनचा ऋणानुबंद जुडलेला होता. म्हणून त्यांनी या पत्राची सुरुवातच माझ्या टोपण नावाने केली आहे.
0 केकी मूस यांचे क्लोजअप छायाचित्र भुसावळचे मधू साळी यांनी काढले आहे.
0 केकी मूस यांनी 27 ऑक्टोबर 1981 रोजी विवेक वणीकरांना लिहिलेले हे पत्र.
> बाबूजी नेहमीच मोजक्या लोकांशी संवाद साधायचे. त्यात शिल्पकार राम सुतार, भुसावळचे मधू साळी, पवार काका, सर्जेकर काका, वसंत वणीकर, विवेक वणीकर, धुळ्याचे अंबादास भालेराव आदींचा समावेश होता.
> बाबूजींचा आवडता विषय ‘टेबल टॉप’ फोटोग्राफी होता. त्यांनी सारं जग आपल्या चारभिंतीच्या आत टेबलावर निर्माण केलं होतं. कलादालनातील गंगा, यमुना या दोन्ही मूर्ती शिल्पकार राम सुतारांनी साकारल्या आहेत.
संगीत विषयावर बाबूजींचे प्रेम होते. धुळ्याचे अंबादास भालेराव यांनी त्यांना सतार वादन शिकवले होते. बाबूजींचे व्यक्तिमत्त्व बहुभाषिक होते.
पंडित जवाहरलाल नेहरूंना पडली होती भुरळ
बाबूजींनी माठ, लाकडी भूसा, कापूस, वाळलेल्या काड्या, फांद्यांचा वापर करून स्वित्झर्लंडचा गोठवणारा हिवाळा उभा केलेले टेबलटॉप कृष्णधवल छायाचित्र काढले होते. चाळीसगावच्या कलादालनाला भेट देण्यासाठी आलेले तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या दृश्यातील हिवाळा पाहून ‘यू हॅव ब्राऊट माय काश्मीर इन डार्करूम’ असे उद्गार काढले होते, अशी आठवण बाबूजी चाहत्यांना नेहमी सांगायचे, असे वणीकरांनी सांगितले.
बाबूजी गेटपर्यंत आले होते
कलादालनाचे गेट ओलांडून बाबूजी आयुष्यात शेवटपर्यंत बाहेर आले नाहीत. भेटीसाठी येणार्‍यांशी चर्चा विनिमय केल्यानंतर ते आपल्या कलादालनाच्या दरवाजातूनच निरोप द्यायचे. मात्र, आम्हाला निरोप देण्यासाठी ते बाहेरील गेटपर्यंत येऊन उभे राहिले होते. एवढेच नाही तर या गेटजवळ आल्यावर त्यांनी त्यांचा एक फोटो काढण्यास सांगितले होते. कलातपस्वीची छबी कॅमेर्‍यात टिपण्याची संधी मिळाल्याने ती साधली. त्याच्या प्रिंटही काढल्या होत्या. मात्र, त्या सध्या उपलब्ध नाहीत. परंतु या फोटोच्या कृष्णधवल निगेटिव्ह सांभाळून ठेवल्या आहेत. ‘याशिका’ कॅमेर्‍याच्या या 6 सेंटिमीटर बाय 6 सेंटिमीटरच्या निगेटिव्ह आहेत. त्यांची प्रिंट काढणारी यंत्रणा दुर्मीळ असली तरी त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही विवेक वणीकर नमूद करतात.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिध्वज फडकावणारे छायाचित्रकार ‘केकी मूस’ अर्थात बाबूजींच्या लेखणीतून गिरवलेला प्रत्येक शब्द सुंदर हस्ताक्षराचा नमुना आहे. भुसावळचे छायाचित्रकार विवेक वणीकर यांना त्यांनी 27 ऑक्टोबर 1981 रोजी स्वहस्ताक्षरातील एक लेटरपॅड दिले आहे. वणीकरांनी ते 32 वर्षांपासून देवघरातील मूर्तीसारखं जपून ठेवलं आहे.