आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस, केरोसीन गोडाऊन शहरात; तहसीलदारांचा धाक नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहराच्या झालेल्या विस्तारामुळे एकेकाळी शहराबाहेर असलेले एलपीजी गॅस आणि केरोसीन गोडाऊन कालानुरूप शहराच्या मध्यभागी आले आहेत. शहरांतर्गत असलेले गॅस आणि केरोसीन गोडाऊन शहराबाहेर हलवण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने तीन महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. मात्र, अजूनही गॅस गोडाऊन शहरातच आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाचा आणि पर्यायाने तहसीलदारांचा परवानाधारकांवर असलेला धाक संपल्याचे दिसून येत आहे.
शहरातील लालमंदिर औद्योगिक वसाहत परिसरात गॅसचे गोडाऊन आहे. बत्तीसखोली खडकारोड परिसरातही केरोसीनचे मोठे गोडाऊन आहे. पांडुरंग टॉकीज परिसर आणि रेल्वे कंझ्युमर सोसायटीचे गॅस गोडाऊनही शहरातच आहे. बदलत्या काळानुसार विस्तारीकरणाच्या प्रवाहात हे गोडाऊन शहरात समाविष्ट झाले आहेत.
गॅस आणि केरोसीनचा समावेश स्फोटक पदार्थांमध्ये करण्यात येतो. कायद्यानुसार गॅस आणि केरोसीनचे गोडाऊन शहराबाहेर असणे आवश्यक आहे. तसेच गोडाऊनमध्ये अग्निशामक यंत्रणा असणे देखील गरजेचे आहे. याबाबत मात्र, उलटे चित्र शहरात आहे. केरोसीन गोडाऊन असलेल्या भागात दररोज शहरातील हॉकर्सची वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा याठिकाणी कोणतीही उपाययोजना अवलंबली जात नाही. सर्व नियमांना धाब्यावर बसवून भर वस्तीत गोडाऊन सुरू असूनही पुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी ‘दिव्य मराठी’ने या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर पुरवठा विभागाने कार्यतत्परता दाखवत गोडाऊन मालकांना नोटीस बजावल्या. मात्र, या नोटिसीलाही संबंधित मालकांनी केराची टोपली दाखवली.
सध्या केवळ तीन गॅस गोडाऊन शहराच्या बाहेर आहेत. इतर मात्र शहरात असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. पुरवठा विभागाने के वळ एकवेळ नोटीस देऊन याविषयी सारवासारव केली आहे. त्यामुळे भविष्यात काही गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाकडे असेल? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
ना हरकत मिळाले कसे - शहरात किंवा शहराबाहेर गॅस गोडाऊन उभारण्यासाठी पालिकेच्या अग्निशामक दल यंत्रणेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. गॅस गुदामात अग्निशामक दलाची वाहने जावी यासाठी रुंद रस्ता असणेही आवश्यक असते. मात्र, शहरातील बहुतांश गॅस गुदाम अरुं द रस्त्यांवर आहेत. त्यांना पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेच कसे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
गोडाऊन मालकांना पुन्हा देणार नोटीस - शहरातील गॅस गोडाऊन मालकांना यापूर्वी नोटीस बजावली आहे. मात्र अजूनही गोडाऊन शहराबाहेर गेलेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा नोटीस बजावण्यात येईल. सुरक्षेच्यादृष्टीने शहरातील सर्व गॅस आणि केरोसीन डेपो शहराबाहेर असणे आवश्यक आहे, अशी माहिती पुरवठा निरीक्षक एफ.के.जमादार यांनी दिली.