आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे जिल्ह्याच्या कोट्यात कपात करून रॉकेलमाफियांना शासनाची चपराक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - गॅसधारकांची संख्या वाढत असल्याने शासनाने रॉकेल कपातीवर भर दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या कपातीमुळे जिल्ह्याचे रॉकेल नियतन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. एप्रिल महिन्याच्या रॉकेल कोट्यात शासनाने पुन्हा 396 किलोलिटरची कपात केली आहे. त्यामुळे यापुढे आता जिल्ह्यास दरमहा फक्त एक हजार 152 किलोलिटर रॉकेल मिळेल. रॉकेल कोटा कमी झाल्यामुळे काळाबाजार अधिक होण्याचा धोका आहे. त्यामुळे गोरगरीब लाभार्थी रॉकेलपासून वंचित राहाणार नाहीत, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

एकाच ग्राहकाला रॉकेल आणि गॅस असा दुहेरी लाभ मिळत असल्यामुळे रॉकेलचा काळाबाजार मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ज्यांना रॉकेलची गरज आहे त्याच ग्राहकांना रॉकेल देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन गॅस सिलिंडर असणार्‍या ग्राहकांचा रॉकेलपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे एक सिलिंडर आहे त्यांच्या रॉकेल कोट्यातदेखील कपात करण्यात आली आहे. सिलिंडरधारकांमार्फत भरून घेण्यात आलेल्या केवायसी अर्जामुळे गॅसधारकांचा निश्चित आकडा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे या वर्षी पुन्हा एकदा रॉकेलच्या कोट्यात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे काही वर्षांपासून रॉकेलचा गोरखधंदा करणार्‍यांना चपराक बसणार आहे.

तीन वर्षांत निम्मेपेक्षा जास्त कपात

सलग तीन वर्षांपासून रॉकेलपुरवठय़ात कपात होत आहे. जिल्ह्यात मार्च 2012मध्ये रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला होता. त्यानंतर मे 2011मध्ये जिल्ह्याला 3 हजार किलोलिटर रॉकेलचा पुरवठा करण्यात येत होता. त्यात जून 2011मध्ये पुन्हा 708 किलोलिटरने कपात करण्यात आली. त्यानंतर मार्च 2012पर्यंत जिल्ह्याला दोन हजार 292 किलोलिटर रॉकेलचा पुरवठा होत होता. त्यात पुन्हा एप्रिल 2012मध्ये 744 किलोलिटरची कपात करण्यात आल्याने मार्च 2013 पर्यंत एक हजार 548 किलोलिटर एवढे रॉकेलचे नियतन मिळत होते. त्यात पुन्हा एकदा कपात झाली असून, एप्रिल ते जून 2013 या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला एक हजार 152 किलोलिटर रॉकेलचे नियतन मिळणार आहे. याचाच अर्थ रॉकेलच्या कोट्यात पुन्हा 396 किलोलिटरने कपात करण्यात आली आहे.
असे मिळेल आता रॉकेल
जिल्ह्यास आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमार्फत 624, भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून 252 आणि हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे 276 किलोलिटर रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यास प्राप्त होणार्‍या रॉकेलपुरवठय़ाची माहिती 5 तारखेपर्यंत पुरवठा विभागाने शासनाला सादर करणे आवश्यक आहे.
875 किरकोळ विक्रेते
133 अर्धघाऊक विक्रेते
13 घाऊक विक्रेते
3,74,384 शिधापत्रिकाधारक
127 हॉकर्स