आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेलचा काळा बाजार; पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ ठरू नये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी धडाकेबाज कारवाई करून आठ हजार लीटर नीळे रॉकेल पकडले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीच्या शहर उपाध्यक्षाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. रॉकेलच्या काळ्या बाजाराशी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचे जुळलेले तार भुसावळकरांना ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीची आठवण करून देणारे ठरते की काय? अशी चर्चा आहे.

यापूर्वी एलसीबीचे पोलिस निरीक्षक डी.डी.गवारे यांच्या पथकाने जळगावहून भुसावळात येऊन महामार्गालगत 500 लीटर नीळे रॉकेल पकडले होते. खरे तर तेव्हाच महसूल विभागाने दक्षता घेणे अपेक्षित होते. मात्र, कुणीही गांभीर्य न दाखवता ‘डोळे मिटून दूध पिण्या’ची भूमिका घेतली. यानंतर तालुका पोलिसांनी संशयावरून रेशनचे धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक ताब्यात घेतला होता. या वेळी महसूलने ‘धुतल्या तांदळा’चा आव आणला. आता मंगळवारी (दि.3) झालेल्या कारवाईचे खरे र्शेय बाजारपेठ पोलिसांना असले तरी या मुळे पुरवठा विभागाचे पितळ मात्र उघडे पडले हे विशेष.

दरम्यान, भुसावळातील राजकीय सद्यस्थिती पाहता विकासासाठी आसुसलेल्या जनतेला पालकमंत्री संजय सावकारेंकडून प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, त्यांच्या हस्तेच नियुक्तीपत्र स्वीकारणार्‍या पदाधिकार्‍याने लावलेले काळ्या बाजारातील दिवे पाहून सूज्ञ जनतेचा अपेक्षाभंग होऊ शकतो. पक्षाशी संबंधित कथित मंडळींचे हे नसते उपद्व्याप थांबवण्यासाठी त्यांनी कणखर भूमिका घेणे अपेक्षित आहे. नसता आपलेही पाय मातीचेच आहे, असे भुसावळकरांनी म्हटल्यास नवल वाटू नये!

शेखसाठी आग्रह कुणाचा?
रईसची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करताना राष्ट्रवादीतील कथित ‘चाणक्यां’ना त्याच्या पार्श्वभूमीची माहिती नसेलच असे नाही. तरीही नियुक्ती देण्यामागील ‘गुपीत’ काय? रईससाठी कोण आग्रही होते? या प्रश्नांची उत्तरे भुसावळकरांना मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा राजकीय पदाचा दुरूपयोग करणार्‍यांची संख्या वाढू शकते. याचा त्रास मात्र जनतेलाच होईल.

रॉकेल आले कुठून?
शेखकडे सापडलेले तब्बल 8 हजार लीटर नीळे रॉकेल नेमके कुठून आले ? त्याची विक्री ट्रकचालकांना होते की, अन्य कुठे? विक्री नेमक्या कोणत्या ठिकाणी होते? यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का ? पुरवठा विभागाची नेमकी भूमिका काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्यांना मिळणे आवश्यक आहे. डीवायएसपी विवेक पानसरे, पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासारख्या अधिकार्‍यांकडून भुसावळकरांनी ही अपेक्षा करणे गैर नक्कीच नाही.

आरोपीचा शोध सुरू
संशयित रईस शेखच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. शिवाय पोलिसांनी अवैधपणे रॉकेल विक्री करणार्‍या अन्य वितरकांची सुद्धा माहिती काढणे सुरू केले आहे. या मुळे भविष्यात मोठय़ा कारवाईची शक्यता आहे. जप्त केलेला रॉकेलसाठा पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे.

लुडबूड करणारी ती व्यक्ती कोण?
तालुका पोलिसांनी गेल्या महिन्यात रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक संशयावरून ताब्यात घेतला होता. हा ट्रक सुटावा यासाठी एका नेत्याच्या नातेवाइकाने हालचाली केल्या होत्या. रेशन दुकानदारांची एवढी काळजी करणारी ती व्यक्ती कोण? अशी चर्चा पोलिसांमध्येच रंगली होती.