आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेलचे अनुदान मिळवण्यासाठी रेशनकार्डधारकांना अडचणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- केरोसिन वितरण प्रणालीतील गैरव्यवहार थांबविण्यासाठी रेशनकार्डधारकांना अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी बँक खाते उघडण्यासाठी प्रक्रिया तहसील कार्यालयाला पुन्हा सर्वेक्षण मोहीम हाती घ्यावी लागली आहे. विशेषत: बँक खाते हे महिलेच्या नावावर अथवा संयुक्त खाते असावे, अशी अट शासनाने घातल्यामुळे शासकीय यंत्रणेची मोठी तारांबळ उडते आहे.

रेशनकार्ड मिळविणे ही जिकिरीची प्रक्रिया समजली जाते. त्यातच आता शासनाने रेशन कार्डधारकांना केरोसिन कार्डावर वाटप न करता त्याचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून ते अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरासह तालुक्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना टप्प्याटप्प्याने बँक खाते उघडावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्रय़ रेषेखालील आणि अंत्योदय योजनेच्या रेशनकार्डधारकांना अनुदान देण्यात येणार आहे. त्याची माहिती गोळा करण्याचे काम तहसील कार्यालयाकडून सुरू झाले आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांसाठी नवीन डोकेदुखी समोर उभी राहिली आहे. बँक खात्यासोबतच आधारकार्ड क्रमांक आणि गॅसबाबतची माहितीदेखील संकलित केली जात आहे. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात सर्वच शिधापत्रिकाधारकांना अनुदान बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही होणार आहे.

झिरो बॅलन्सवर उघडणार खाते
कुटुंबातील महिला सदस्याच्या नावाने बँकेत बचत खाते उघडण्यात येत आहे. ज्या कुटुंबप्रमुख पुरुषांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असलेले खाते पत्नीच्या नावासह संयुक्त करणे बंधनकारक आहे. त्यासाठी झिरो बॅलन्स खाते उघडण्याबाबत बँकांना आदेश देण्यात आले आहेत. त्याबाबतची नुकतीच बैठक झाली. यात अशा खात्यात तीन महिन्यांत रक्कम जमा न झाल्यास ते लॅप्स होतील, असेही संकेत बँकांनी दिले आहेत.

कशासाठी हवे बँक खाते
आतापर्यंत रेशन दुकानावरच स्वस्तात रॉकेल किंवा अन्नधान्य मिळत होते. यापुढे दारिद्रय़ रेषेखालील व अंत्योदय योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला ठरलेल्या कोट्याप्रमाणे रॉकेल मिळेल. पण ते रेशनदुकानात स्वस्तात घेता येणार नाही. तेथील किंमत सर्वांसाठी सारखीच असेल. मात्र, ठरावीक कोट्याचे अनुदान लाभार्थींना मिळेल.