आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटामाइनप्रकरणी ‘रुख्मा’चा भागीदार विलास चिंचोले अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केटामाइन प्रकरणात सील केलेली एमआयडीसीतील कंपनी रुख्मा इंडस्ट्रीजचे भागीदार विलास रामकृष्ण चिंचोले (वय 63) यांना केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने रात्री उशिरा जळगावातील त्याच्या घरातून अटक केली. विलास चिंचोले हे नितीन चिंचोले यांचे काका असून त्यांचा रुख्मा इंडस्ट्रीजमध्ये 51 टक्के वाटा आहे.

डीआरआयच्या पथकाने 14 डिसेंबर रोजी रुख्मा इंडस्ट्रीजवर धाड टाकून अवैधरित्या तयार करण्यात आलेले केटामाइन जप्त केले. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला नितीन चिंचोले अद्याप पथकाच्या हाती लागलेला नाही. मात्र गुरुवारी रात्री नितीनचे काका विलास चिंचोले यांना अटक झाली. त्यांच्याकडून दोन कोटी 20 लाख रुपये किमतीचे 20 किलो केटामाइन, 362 ग्रॅम सोने आणि दीड लाख रुपये रोख, असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विलास चिंचोले यांनी रोकड आणि सोने शहरातील जनता बॅँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. तेथूनच ते हस्तगत करण्यात आले. चिंचोले यांचा मोहाडी रस्त्यावर ‘शंकुतारा’ नावाचा बंगला आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता चिंचोले यांना न्यायाधीश व्ही.एस.पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती चिंचोले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पुढील कामकाज 10 जानेवारी रोजी होणार आहे.

विलास चिंचोले यांना न्यायालयीन कोठडीदरम्यान घरचे जेवण आणि औषधी घेण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती चिंचोले यांचे वकील ए.बी.केसकर यांनी न्यायालयात केली. कारागृहाच्या नियमात बसणार असेल तर न्यायालयाला हरकत नाही, असे निर्देश मिळाले.

तपासाधिकार्‍यास न्यायालयाने फटकारले: केटामाइन प्रकरणात 14 डिसेंबरपासून जळगावात आलेल्या डीआरआयच्या पथकाने आत्तापर्यंत काय कारवाई केली? संबंधित गुन्ह्याची नोंद कोणत्या विभागात केली आहे. गुन्हा नोंदणीची प्रत न्यायालयात का सादर केली नाही? या कारणांवरून न्यायाधीश डी.जे.शेगोकार यांनी तपासाधिकारी व्ही.आर.परमार यांना चांगलेच फटकारले. डीआरआयच्या कारवाईत एफआयआर दाखल होत नाही तर संबंधित संशयितांच्या नावाची फाइल तयार होते.

त्या फाइलचा क्रमांकच न्यायालयीन कामासाठी वापरता येतो, असे स्पष्टीकरण तपासाधिकारी परमार यांनी न्यायालयाला दिले. त्यानंतर न्यायालयाने परमार यांना फटकारले. संबंधित कागदपत्रे हे न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे पुढील तारखेला संपूर्ण माहितीसह हजर रहावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. दरम्यान डीआरआयने आत्तापर्यंत काय कारवाई केली, ते अटकेत असलेल्या संशयितांच्या नातेवाइकांनाही माहित नाही. शुक्रवारी ते मिळवण्याचा अर्ज करण्यासाठी काही संशयितांचे नातेवाईक न्यायालयात हजर होते. मात्र, आत्तापर्यंत झालेल्या कामकाजासंदर्भात त्यांना काहीएक माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे त्आपणांस पुढे काहीही करता येत नसल्याचे अटक करण्यात आलेल्या नातेवाइकांनी सांगितले.

झोपेसह इतरांच्या कोठडीतही वाढ
डीआरआयच्या पथकाने गुरुवारीच मुंबई येथून खेमा मधुकर झोपे या संशयितास अटक केली होती. खेमा झोपेसह यापूर्वी अटक केलेल्या वरुणकुमार तिवारी, गौरीप्रसाद पाल, नित्यानंद थेवर, कांतीलाल सोनवणे, विकास पुरी आणि जी.श्रीनिवास राव या सहा संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. या सर्वांना न्यायालयीन कोठडीत 10 जानेवारीपर्यंत वाढ केली. सरकारपक्षातर्फे अँड.संभाजी जाधव यांनी काम पाहिले.

झोपे तयार करायचा केटामाइन
परदेशातून तसेच परराज्यातून मागवण्यात आलेल्या कच्च मालापासून केटामाइन तयार करण्याचे काम के.एम.झोपे करीत होता, असे तपासात समोर आले आहे. झोपेला या कामासाठी आत्तापर्यंत 22 लाख रुपये अदा करण्यात आले होते. झोपे मूळचा भालोद येथील रहिवासी आहे. मात्र, सध्या तो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे वास्तव्याला आहे. डीआरआयच्या पथकाने त्याला अंबरनाथ येथूनच अटक केली आहे.