आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khadse Savakare Panel Defeated In Bhusawal Market Committee

खडसे-सावकारेंच्या पॅनलचा पराभव, भुसावळ बाजार समितीत शिवसेनाप्रणीत पॅनलला बहुमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: बाजार समितीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी निकालानंतर असा जल्लोष केला.
भुसावळ - बहुचर्चीत भुसावळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ संचालक निवडण्यासाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी डॉ.खाचणे सभागृहात मतमोजणी झाली. मतमोजणीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या शिवसेनाप्रणित सहकार पॅनलच्या १३ उमेदवारांना मतदारांनी कौल दिला. तर पालकमंत्री एकनाथ खडसे आणि आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.

अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीतून सोमवारी धक्कादायक निकाल समोर आले. १८ संचालकांसाठी शेतकरी पॅनलचे १७ तर सहकार पॅनलचे १८ उमेदवार रिंगणात होते. सोबतच दोन अपक्षही रिंगणात असल्याने चुरस वाढली होती. मात्र, मतदारांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार गटाला विजयाचा कौल दिला. सहकार पॅनलमधून व्यापारी मतदारसंघात चार, तर महिला राखीव सोसायटी मतदारसंघातून दोन उमेदवार विजयी झाले. सोबतच सोसायटी-इतर मागासवर्ग मतदारसंघ, विमुक्त जाती-भटक्या जमाती, ग्रामपंचायत सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत मतदारसंघ, आर्थिक दुर्बल घटक, हमाल- मापाडी, आणि व्यापारी अशा मतदारसंघातून प्रत्येकी एक अशा एकूण १३ उमेदवारांनी विजय मिळवला. निकालामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. निकालानंतर विजयी उमेदवारांसह माजी आमदार संतोष चौधरी यांनी महामार्गालगत असलेल्या माळी भवनात पत्रकार परिषद घेतली.

शेतकरी पॅनलचे पाच उमेदवार विजयी
पालकमंत्री एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या शेतकरी पॅनलला अवघ्या पाच जागा मिळाल्या. सोसायटी मतदारसंघात तीन, ग्रामपंचायत आणि व्यापारी मतदारसंघात प्रत्येकी एक, असे केवळ पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

सर्वसाधारण सोसायटी : राजेश जोशी (सहकार पॅनल), सुभाष पाटील (सहकार पॅनल), कैलास महाजन (सहकार पॅनल), ओंकार वारके (सहकार पॅनल), डिगंबर कोल्हे (शेतकरी पॅनल), संजय पाटील (शेतकरी पॅनल), सुनील महाजन (शेतकरी पॅनल) , इतर मागासवर्ग मतदारसंघ : सोपान भारंबे (सहकार पॅनल), विमुक्त जाती-भटक्या जमाती : अशोक पाटील (सहकार पॅनल), महिला राखीव मतदारसंघ : कोकिळाबाई पाटील(सहकार पॅनल) , इंदूबाई महाजन(सहकार पॅनल) , व्यापारी : नरेंद्र अग्रवाल (सहकार पॅनल), जयंतीलाल सुराणा (शेतकरी पॅनल), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ : गजानन सरोदे (सहकार पॅनल), प्रदीप वाणी (शेतकरी पॅनल), अनुसूचित जाती जमाती : नारायण सपकाळे (सहकार पॅनल) आर्थिक दुर्बल घटक : प्रमिला पाटील (सहकार पॅनल) , हमाल-मापाडी : कैलास गव्हाणे (सहकार पॅनल). निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी खाचणे हॉलबाहेर एकच जल्लेष केला.

पाच टेबल लावले
निवडणुकीत५४२ पैकी ५३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर मतमोजणीसाठी केंद्रात पाच टेबलांवर प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी बागल यांच्यासह मनोज चौधरी, भाऊसाहेब महाले, डी.व्ही.पाटील, धीरज पाटील, राकेश ठाकरे यांनी नियोजन केले होते. प्रशासनाने मतमोजणीसाठी कुशल नियोजन केल्यामुळे प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडली.

फेरमत मोजणीचे अर्ज
शेतकरीपॅनलच्या काही उमेदवारांचा अवघ्या एक ते दोन मतांनी पराभव झाल्याने त्यांनी फेरमतमोजणीचा अर्ज सादर केला होता. त्यानुसार फेरमतमोजणी करण्यात आली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
ईश्वरचिठ्ठी काढली
हमाल-मापाडीमतदारसंघातील उमेदवार असगरअली कासमअली आणि कैलास विठ्ठल गव्हाणे यांना समान अशी १५ मते मिळाली होती. त्यामुळे विराज शर्मा या बालकाच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात सहकार पॅनलचे कैलास गव्हाणे विजयी झाले.
>स्वंतत्र कार्यालय उभारू :शहरातील खासगी कार्यालयातून यापुढे शिवसेनेचे कामकाज चालणार नाही. यासाठी दिवाळीपूर्वी जामनेर रोडवर शिवसेनेचे स्वंतत्र कार्यालय उभारणीचे काम हाती घेतले जाईल, अशी घोषणा माजी आमदार चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
>मातोश्रीवरून निवड:बाजार समिती सभापती आणि उपसभापतींची नावे मातोश्रीवरून जाहीर केली जातील. नावे जाहीर झालेल्यांनाच सभापती आणि उपसभापती पदावर विराजमान केले जाईल, असेही चौधरी यांनी बोलताना सांगितले.