आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देशचे भूमिपुत्र नेमाडेंना ज्ञानपीठ हा मराठीचा सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खान्देश भूमिपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर साहित्य विश्वात दिवाळी साजरी झाली. आपल्या स्वतंत्र साहित्य शैलीने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारे नेमाडे म्हणजे मराठी साहित्याचे भूषण. ज्ञानपीठाच्या निमित्ताने त्यांचे सहृद ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर आणि विचारवंत, लेखक भंवरलाल जैन यांनी व्यक्त केलेले मनोगत.
नवसाहित्याचा बाज कायम राखला
ना.धों. महानोर : नेमाडेंनाज्ञानपीठ मिळाल्याची बातमी ऐकून खूप आनंद झाला. अनेक प्रतिभावंत असतानाही मराठीला आजवर फक्त तीन ज्ञानपीठ मिळालेत. चौथे ज्ञानपीठ नेमाडेंना मिळाले याचा आनंद त्यांच्या इतकाच महाराष्ट्रातील प्रत्येकाला आहे. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा भाषांतर आदी सर्वच विषयात भरभरून योगदान दिले. त्यांना उत्तमातील उत्तम भाषांतर तंत्र माहित आहे. त्यांनी इतरही कवींचे साहित्य एकत्रित करून गेल्या ५० वर्षांत कुणीही केले नव्हते, असे भाषांतराचे भरीव काम करून देशातील साहित्य विश्वात महाराष्ट्राचा ठसा उमटवला. त्यांच्यासोबत माझा ४० वर्षांचा सहवास आहे. त्यांना सोबत घेऊन मी औरंगाबादला गेलो. तेथे २० वर्षे एकत्रित काम केले. त्यानंतर ते गोव्याला, लंडनला गेले. ते जिथे गेले तिथे त्यांनी नवसाहित्याचा आपला बाज कायम राखला. "कोसला'पासून "बिऱ्हाड', "झूल', "जरीला' या कांदबरी चतुष्टक असो की 'हिंदू'चे चार खंड असोत. एवढे दीर्घ लिखाण ५० वर्षांत कुणीही केले नाही.

स्वत:च्या विचारांना चिकटून राहणारा साहित्यिक
भंवरलाल जैन : गेल्या२१ वर्षांपासून नेमाडेसाहेब या अवलिया साहित्यिक मित्राशी माझे आकडे जुळले. त्यांना ज्ञानपीठ हा साहित्यिक क्षेत्रातील सर्वाेच्च बहुमान जाहीर झाल्याने मी आनंदविभोर झालो आहे. त्यांच्या कित्येक साहित्यकृतींमुळे मला ते जेवढे भावत नाहीत, त्यापेक्षा त्यांच्या मिशांमुळे ते मला अधिक भावतात. काही साहित्यिक मित्र मंडळींनी त्यांच्या लिखाणाबद्दल काय ते निरीक्षण करावे आणि वाटेल तेवढ्या वावड्या उठवाव्यात; परंतु त्याची दखल घेता, कीव करणारा स्वत:च्या विचारांना फेव्हिकॉलसारखा चिकटून राहणारा हा अफलातून साहित्यिक आहे. नावीन्यपूर्णता एखाद्या विषयाला किंवा विचाराला सोपे करून ते मांडण्याची त्यांची हातो टी काही औरच आहे. मानवी जगण्यातील ज्या काही अडगळी असतील, त्या बाजूला सारत हे जगणे ते अधिक समृद्ध कसे करावे याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्या लिखाणाकडे बघता येईल. खरंच मित्र म्हणून मी त्यांची स्तुती करणे टाळतो , तो ही एक मैत्रिधर्म नव्हे का?