आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Khandesh Vikas Aghadi Bycotte On Jalgoan Municipal Corporation Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देश विकास आघाडीचा जळगाव महापालिकच्‍या न‍िवडणुकीवर बह‍िष्‍कार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल गैरव्यवहार आणि परिवहन प्रकरणात तत्कालीन नगरसेवकांना प्रत्येकी सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस प्रशासनाने दिल्यामुळे सत्ताधारी खान्देश विकास आघाडीत खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासन विरोधकांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करीत महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनी रात्री दिला.


घरकुल योजनेमुळे आणि शहर परिवहन सेवा मोफत पुरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची वसुली हे निर्णय घेणा-या नगरसेवक आणि पदाधिका-यांकडून करण्याची शिफारस लेखापरीक्षकांनी केली होती. घरकुल आणि परिवहन प्रकरणात स्वतंत्र नोटीस रात्री संबंधितांच्या घरी महापालिकेच्या कर्मचा-यांच्या हस्ते बजावण्यात आल्या आहेत. त्यात अनुक्रमे 45 आणि 48 नगरसेवकांचा समावेश आहे.


हा तर न्यायालयाचा अवमान
महापालिकेची निवडणूक सुरू असताना आणि घरकुल प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असताना अशा प्रकारे नोटीस बजावणे म्हणजे न्यायालयाचा अवमानच आहे, असे रमेश जैन यांनी नमूद केले आहे. रात्री उशिरा त्यांच्याकडून आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विरोधक प्रशासनाला हाताशी धरून दबाव, दहशत, भीती निर्माण करीत आहेत. त्याचा निषेध करीत खान्देश विकास आघाडीचे उमेदवार या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करीत आहेत. जनतेसाठी, लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयावर शासन घेत असलेल्या दुटप्पी भूमिकेला व राजकीय षडयंत्राला बळी पडलेल्या या निर्णयाचा जनता जनार्दनच योग्य निकाल लावेल. आमचा न्यायदेवतेवर, निवडणूक अधिका-यांवर आणि जनतेवर पूर्ण विश्वास आहे.


निवडणूक आयोगाला विनंती
दरम्यान, या प्रकाराची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी आणि सत्तेची लालसा असलेल्या विरोधकांच्या कुटील कटकारस्थानाला बळी न पडता निर्णय द्यावा, अशी विनंतीही खान्देश विकास आघाडीतर्फे निवडणूक आयोगाला केली आहे.


न्यायालयात जाण्याची शक्यता
नोटीसा दिल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर आमदार सुरेश जैन यांच्या निवासस्थानी रात्री निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. याप्रकरणी न्यायालयात जाण्याबाबतही विचारविनिमय सुरू होता.


अर्ज मागे घेतले जातील
विरोधकांकडून ज्या पद्धतीने कारवाया केल्या जात आहेत, त्या लक्षात घेता महापालिकेची ही निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात होईल, असे वाटत नाही. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन बहिष्काराचा मार्ग अवलंबता येईल. -रमेश जैन, खान्देश विकास आघाडीप्रमुख


61 कोटी वसुलीच्या नोटिसा
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल तसेच मोफत बस सेवाप्रकरणी प्रशासनाकडून वसुलीच्या नोटिसा सोमवारी जारी करण्यात आल्या. दोन्ही प्रकरणात 61 कोटी 50 लाख रुपये नुकसान भरपाई वसूल करण्यात येत असून एकूण 57 जणांना या नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक काळात नोटीस मिळाल्याने आजी-माजी नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत.


नगरपालिकेतर्फे सन 1996 ते 2006 या कालावधीत फुकट बस प्रवास योजना, पेव्हर रस्ते डांबरीकरण, वाघूर पाणीपुरवठा, घरकुल योजना, विमानतळ योजना राबविण्यात आल्या होत्या. या योजनांचे विशेष लेखापरीक्षण राज्य शासनाकडून करवून घेण्यात आले होते.

कायदा काय म्हणतो?
आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतर ती स्वीकारली किंवा नाकारली तरी नोटीस स्वीकारली असेच मानले जाते. स्वीकारली नाही तर पुढची पायरी म्हणून ती संबंधितांच्या घरावर डकवली (चिकटवली) जाते. थकबाकी भरल्याशिवाय कोणताही उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरू शकत नाही.
अ‍ॅड. संजय राणे