आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khandesh Vikas Aghadi News In Marathi, Jalgaon Municipal Corporation, Divya Marathi

खान्देश विकास आघाडीचे नगरसेवक तनाने सोबत मनाने कुठे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आयोजित बैठकीला खाविआचे बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते. परंतु महापालिका निवडणुकीत ज्यांच्याविरुद्ध चुरशीची लढत दिली त्यांच्यासोबत काम कसे करायचे असा प्रश्न नगरसेवकांचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक तनाने राष्ट्रवादीसोबत असले तरी मनाने कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रविवारी झालेल्या पिंप्राळ्यातील रॅलीत असलेली नगरसेवकांची अनुपस्थिती त्यातून बरेच काही सांगून गेली.
सहा महिन्यांपूर्वी जळगाव महापालिकेची निवडणूक पार पडली. खाविआला शहरवासीयांनी पुन्हा कौल दिला. राष्ट्रवादीची ताकद घटली. दोन्ही पक्ष आमने सामने उभे राहिले. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील नाते ताणले गेले आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोबत काम करण्याचे आदेश आल्याने नगरसेवकांच्या शिलेदारांमध्ये संभ्रम आहे. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या हातात हात घेऊन प्रचार कसा करायचा यावर आता खल सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरातून सुरेश जैन किंवा खाविआचा कोणी उमेदवार रिंगणात राहिल्यास त्याला राष्ट्रवादी मदत करेल का? असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पाया खालून बरेच पाणी वाहून जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असाही प्रश्‍न उपस्थित होतोय. मनपा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीपेक्षाही भाजपसोबत संबंध अधिकच ताणले गेल्याने प्रचाराचे काम करायचे की नाही यासारख्या विचारांनी कार्यकर्त्यांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर झाला असला तरी खाविआचे नगरसेवक किती काम करतात हे आगामी काळात पाहायला मिळेल.


महायुती की राष्ट्रवादी
माजी नगरसेवक श्याम कोगटा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यालयाजवळ पोहचल्याने चहापाण्याचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचे कोगटा खाविआशी प्रामाणिक राहतात की शिवसेनेशी हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्या संस्था व युवक संघटनांमुळे त्यांची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही. कॉलनी परिसरातील मतदार लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या हिताच्या उमेदवारांना मतदान करतात. ते आतासुद्धा खाविआ नगरसेवकांना त्याच पद्धतीने उत्तर देत असल्याने कॉलनी परिसरातील मतदारांचा कौल कोणाकडे हे मतदानापूर्वीच कळू शकेल.


अशी आहे स्थिती
मनसेचे पालिकेत 12 नगरसेवक असून ते भाजपसाठी कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक अद्याप प्रचाराच्या दृष्टीने रस्त्यावर उतरलेले दिसत नाहीत. भाजपचे सर्व 15 नगरसेवक जोमाने कामाला लागले आहेत. प्रश्‍न खान्देश विकास आघाडीचा आहे. महापौर राखी सोनवणे व त्यांचे पती शामकांत सोनवणे हे खाविआ सोबत पूर्णवेळ प्रचारात राहतील तर गटनेते चंद्रकांत सोनवणे हे चोपडा तालुक्यात भाजपच्या प्रचारात गुंतलेले आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ते चोपडा परिसरात असल्याने त्यांचा जळगाव शहराशी संबंध येत नाही. तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांचे भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध लपून नाहीत. परंतु खाविआचे नगरसेवक असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण शनिपेठ परिसरातील मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे.