आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khandesh Vikas Aghadi News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

खान्देश विकास आघाडीचा पाठिंबा राष्ट्रवादीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी खान्देश विकास आघाडीचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सुरू असलेले चर्चेचे गुर्‍हाळ संपले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव वाणी यांच्या उपस्थितीत रविवारी आघाडीच्या नगरसेवकांची बैठक होऊन औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.


आमदार सुरेश जैन प्रणित खान्देश विकास आघाडीची जळगाव महापालिकेत सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेकांचे प्रय} सुरू होते. शहर विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, केंद्रात अडकलेल्या योजनांसाठी मदत करणे , अडचणीत असलेले आमदार जैन यांना बाहेर काढण्यासाठी मदत करणार्‍याला पाठिंबा देण्याचे आघाडी अध्यक्षांनी जाहीर केले होते. या मुद्यावरून आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करताना खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांना लांब ठेवण्यात आले असल्याने त्यांची नाराजी आहे; ही नाराजी दूर करण्यासाठी सर्व नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसोबत रविवारी दुपारी 12 वाजता बैठक झाल्यानंतर पाठिंबा देण्यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.


बंडखोरांचे आव्हान कायम
खान्देश विकास आघाडीने राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला तरी काही नगरसेवकांनी आपापल्यापद्धतीने नियोजन केले आहे. अनेक वर्षे भाजपमध्ये राहिलेले नगरसेवक कैलास सोनवणे यांनी भाजपला मदत करावी लागेल, असे स्पष्टपणे सांगितले होते. ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे काही नगरसेवकांनी आपण काय करायचे, हे ठरवून घेतले आहे. ‘खाविआ’चे नगरसेवक चंद्रकांत सोनवणे हे शिवसेनेकडून विधानसभेची तयारी करत आहेत; त्यांनी या वेळी राष्ट्रवादीला मदत करायची ठरवल्यास त्यांच्यासमोर पुढे अनेक अडचणी वाढू शकतात. इतरही काही नगरसेवकांचे विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांशी घरोब्याचे संबंध आहेत. या सर्व बाबींचा विचार करता बंडखोरांचे आव्हान आघाडीच्या नेत्यांसमोर राहणार आहे.

बैठकीनंतर घोषणा शक्य
लोकसभा निवडणुकीत कुणाला पाठिंबा जाहीर करावा, यासाठी रविवारी दुपारी रमेश जैन यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर पाठिंब्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे नितीन लढ्ढा, सभापती, स्थायी समिती

नगरसेवकांशी चर्चा करणार
खाविआचे अध्यक्ष रमेश जैन यांची पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. रविवारी खाविआच्या नगरसेवकांशी आमचे प्रमुख पदाधिकारी चर्चा करून सायंकाळी पाठिंब्यासंदर्भात घोषणा होईल. वसंतराव वाणी, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी


पाठिंब्याने काय फरक पडणार?
लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी खान्देश विकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी पक्षांकडून प्रय} केले जात होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण मतदानापैकी 34 टक्के मतदान खान्देश विकास आघाडीने मिळवले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसने 17 टक्के मतदान मिळवले होते. खान्देश विकास आघाडीची जळगाव महानगर पालिकेत सत्ता असून आमदार सुरेश जैन यांना मानणारा मोठा वर्ग जळगाव शहरात आहे. पाठिंबा जाहीर केल्यावर राष्ट्रवादीच्या बरोबरीने खान्देश विकास आघाडीची यंत्रणादेखील अंतिम टप्प्याच्या प्रचारात सहभागी होऊ शकते.