जळगाव - खान्देश विकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका बुचकळ्यात पाडणारी ठरत असल्याने प्रचारासंदर्भात वैयक्तिक संबंध जपताना नगरसेवक क न्फ्युजन होत आहेत. जळगाव शहरात निर्णायक भूमिका बजावणार्या खाविआच्या नगरसेवकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या मुद्दावरून मतभिन्नता असल्यामुळे ‘आधे इधर, आधे उधर’ अशी स्थिती आहे. खाविआचे धोरण अजूनही स्पष्ट होत नसल्याने प्रचाराच्या ऐन तापलेल्या वातावरणात आपण कोणासोबत जावे, याबाबत त्यांच्यात संभ्रम आहे. शहर विकासाच्या मुद्यावर खाविआशी बांधील आहे; मात्र लोकसभेसाठी भाजपा किंवा राष्ट्रवादीचा प्रचार करण्यास मोकळे असल्याचे मत त्यांच्यातून व्यक्त होऊ लागले आहे. माजी महापौर किशोर पाटील हे राष्ट्रवादीच्या रॅलीत सहभागी झाल्याने भाजपासाठी काम करू इच्छिणार्यांनीही आपापल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. खाविआचे नेते रमेश जैन बाहेर गावी असल्याचे कारण पुढे करत दोन दिवसांत भूमिका निश्चित केली जाईल, असे आघाडीकडून सांगितले जात होते; मात्र आठवडा उलटूनही धोरण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यातच नेत्यांच्या भेटी होत नसल्याने नगरसेवकांची गोची झाली आहे. भाजपाचे उमेदवार प्रभागांमध्ये फिरत असल्याने वैयक्तिक संबंध जपताना प्रचार कोणाचा करावा, यासंदर्भात कन्फ्युजन वाढले आहे. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती निर्माण झाल्याने कोणाचाही प्रचार न करता बाहेरगावी निघून जाण्याची मानसिकता काही नगरसेवकांची झाली आहे. दोन्ही पक्षांकडून नगरसेवकांशी संपर्क सुरू झाल्याने नाहक डोकेदुखी नको, असेही बोलले जात आहे.