जळगाव- खान्देशातील वांग्याचे भरीत देशभर प्रसिद्ध आहे. त्याची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली असून र्जमनीच्या लुफ्तांझा एअरलाइन्स विमानाच्या मेनूत ब्रिंजल खिमा या नावाने वांग्याचे भरीत आणि मोमोज या नावाने उकडीचे मोदक मेन्यूमध्ये समाविष्ट झाले आहेत. जळगावच्याच हर्षद पंडित या तरुणाच्या पुढाकाराने हे दोन्ही पदार्थ परदेशी प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहेत.
दोन वर्षांपासून सौदी अरेबियात नोकरीसाठी स्थायिक असलेला हर्षद हा सौदी एअरलाइन्समध्ये सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह पदावर कार्यरत आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील हॉटेल ओबेरॉयमध्ये त्याने तीन वर्षे काम केले. ते करत असतानाच एव्हिएशनचा क्रॅश कोर्स केला. नंतर सौदी अरेबियात नोकरी लागली. विमानातील प्रवाशांना दिल्या जाणार्या जेवणातील पदार्थांची यादी म्हणजेच मेनू तो तयार करतो. त्याच्याच प्रयत्नातून मराठमोळे वांग्याचे भरीत आणि उकडीचे मोदक सातासमुद्रापलीकडच्या मेन्यूमध्ये नुसते समाविष्टच झाले नाहीत तर पसंतीसही उतरले आहेत.
असे करतात मेन्यू प्लॅनिंग..
प्रत्येक विमानात बिझनेस व इकॉनॉमी क्लास असतो. ते प्रवासी कोणत्याही देशाचे असतात. फॅट, पोषणमूल्य किती आहेत याचा सर्व अभ्यास करून त्यांच्यासाठी मेन्यू बनवावा लागतो. हे जेवण अनेक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच विमानात नेण्यात येते. यात अगोदर जेवण तयार करून ब्लास्ट चिलिंग (फ्रोझोन) केले जाते. त्यातील सगळे विषाणू मरेपर्यंत प्रक्रिया करण्यात येते. नंतर विमानातील मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये एका विशिष्ट तापमानात जेवण गरम करून मग प्रवाशांना देण्यात येते. या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतरच तो पदार्थ यादीत समाविष्ट केला जातो.
ब्रिंजल खिमा, उकडीचे मोमोज..
जर्मनीच्या लुफ्तान्झा या एअरलाइन्स कंपनीच्या विमानातील मेनूमध्ये हर्षद याने वांग्याचे भरीत, शेवभाजी व उकडीचे मोदक हे पदार्थ सामाविष्ट केले आहेत. वांग्याचे भरीत हा शब्द तेथील जेवण देणार्या व बनवणार्यांनादेखील बोलता येत नसल्याने ब्रिंजल खिमा नाव देण्यात आले. गोड पदार्थांमध्ये उकडीच्या मोदकाला ‘मोमोज’ हे नाव देण्यात आले. खान्देशी तडका व पद्धतीचे हे भरीत असून फक्त यात तेलाचा उपयोग कमी करण्यात आला आहे. शेवभाजीतही तेल व तिखट कमी करण्यात आले आहे. प्रवाशांकडून प्रतिसाद अर्ज भरून घेतल्यावर तीनही पदार्थांना पसंती मिळाल्याने हा पदार्थ मेनूमध्ये कायम ठेवण्यात आला आहे.