आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरजई रेल्वे गेटजवळ बोगद्याचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - शहरातील खरजई रेल्वे गेट दर 15 मिनिटांनी बंद होत असल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दळणवळणावरही परिणाम जाणवतोय. उड्डाणपुलासाठी येथे जागा पुरेशी नसल्याचा खुलासा रेल्वे प्रशासनाने केल्याने गेटपासून 100 मीटर अंतरावर दोन 12 ते 15 फुटाचे बोगदे तयार करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. उड्डाणपुलाचा विषय मागे पडल्याने पाचोरा शहराच्या धर्तीवर येथे भुयारी मार्ग साकारला जाऊ शकतो का? याची चाचपणी करण्यात आली. मात्र, लांबलचक भुयारी मार्गही येथे शक्य नसल्याने छोटी वाहने पास होतील, असा भुयारी मार्ग (मोर्‍या) तयार करण्याचा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. चाळीसगाव शहरासह दोन तालुक्यातील 22 खेड्यांसाठी खरजई रेल्वे गेट जवळचा मार्ग आहे.

मुंबई-नागपूर रेल्वे महामार्गावर प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांची वाहतूक गेल्या 10 वर्षांत दुपटीने वाढली आहे. जवळपास 200 गाड्या दररोज अप व डाऊन लाइनवरून जा-ये करीत असल्याने साधारण दर 10 ते 15 मिनिटांनी रेल्वे गेट बंद होते. चाळीसगाव शहरातून बाहेर पडण्यासाठी हे एकच रेल्वे गेट असून दुसरा धुळे रोडवरील उड्डाणपूल आहे. खरजई रेल्वे गेट बंद झाल्यावर वाहनधारकांना अडचणीचे ठरते. एक गाडी पास होण्यासाठी 10 मिनिटांसाठी गेट बंद करण्यात येते. अवघ्या 10 मिनिटात येथे दोन्ही बाजूने असंख्य वाहने अडकून पडतात. गेटमनने विरोध केल्यावरही वाहनचालक गेटच्या खालून वाहने काढतात.

पाचोरा ते नांदगाव दरम्यान दोन गेट
पाचोरा ते नांदगाव रेल्वे मार्गावर खरजई व कजगाव हे दोनच रेल्वे गेट आहेत. नगरदेवळा येथे उड्डाणपूल झाल्याने गेट बंद करण्यात आले असून कजगाव रेल्वे गेटच्या तुलनेने खरजई जाणार्‍या मार्गावर वर्दळ पाहता रेल्वे व उपविभागीय कार्यालयातर्फे खरजई रेल्वे गेटवर भुयारी मार्गासाठी सव्र्हे करण्यात आला होता.

पुरेशी जागा नसल्याने प्रस्ताव बारगळला
खरजई रेल्वे गेटवरून उड्डाणपूल साकारण्यासाठी पुरेशी जागा नाही. यासाठी अर्धा किलोमीटरपर्यंत जमिनी संपादीत कराव्या लागल्या असत्या. याशिवाय योग्य वळण नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. याच कारणाने उड्डाणपुलाचा प्रस्ताव बारगळला. टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच किसनराव जोर्वेकर यांच्यासह इतर गावातील नागरिकांनी खासदार ए.टी.पाटील यांच्याकडे उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्यावर खासदार पाटील यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा केल्यावर उड्डाण पुलासाठी सव्र्हे करण्यात आला होता. त्यानंतर पाचोरा शहरासारखा भुयारी मार्ग करता येईल काय? याची चाचपणी करण्यात आली. मात्र तेदेखील शक्य नसल्याने करगाव रोडवरील गणपती मंदिराकडे जाणार्‍या बोगद्याप्रमाणे येथे बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी मोजमाप करण्यात आल्यावर पुढील कारवाई रेल्वे प्रशासन करेल, असे पाचोरा विभागाचे प्रांत गणेश मिसाळ यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले. टाकळी ग्रामपंचायतीने उड्डाणपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. खरजई रोडवर बहाळ, टेकवाडे, वाडे येथील रहिवाशांनी घरे बांधली. वस्ती वाढल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. तातडीने या मार्गाचे काम होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी करगाव रोडवरील बोगद्याप्रमाणे बोगदे होऊ शकतात. येथील जागेची पाहणी करण्यात आली परंतु सुरुवातीला फक्त पाहणी झाली. यासंदर्भात खासदार ए.टी.पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.

या गावांना जाण्याचा मार्ग
खरजई रेल्वे गेटवरून खरजईसह, तळवाडे (पेठ), न्हावे, ढोमणे, बहाळ, गुढे, वाडे, टेकवाडे अशा 22 गावांना जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. गेट वारंवार बंद होत असल्याने वाहने तासन्तास खोळंबतात.

वर्दळ वाढल्याचे कारण
खरजई रेल्वे गेटवर वर्दळ वाढली आहे. 22 खेड्यांसह तळवाडे (पेठ) येथील साईबाबा मंदिर व बहाळ येथील ऋषिपांथा या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याकरिता भाविकांचा ओघ वाढल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. खरजई गेट बंद झाल्यास वाहने अडकून पडतात.

भडगाव तालुक्यासाठी जवळचे
भडगाव तालुक्यासाठी वाडे, गुढे येथे जाण्यासाठी खरजई गेटमार्गे जवळचे अंतर आहे. तेथून पुढे जळगाव, पारोळा येथे जाण्यासाठी फायदेशीर असल्याने वेळ व भाड्याचे पैसे वाचतात. ऋषिपांथा येथील पुलावरून टेकवाडे येथे सहज जाता येते. शहराला जोडणार्‍या या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

वाहनधारकांचे नऊ कि.मी.चे अंतर वाचते
बहाळ येथे जाण्यासाठी मेहुणबारे व खरजई मार्गे असे दोन रस्ते आहे. खरजई गेटकडून चाळीसगाव ते बहाळ अंतर 17 कि.मी.चे असून मेहुणबारे मार्गे चाळीसगाव ते बहाळ हे अंतर 26 कि.मी. चे आहे. खरजईमार्गे गेल्यास 9 कि.मी.चे अंतर वाचते. हीच बाब इतर गावांसाठीही लागू होते. मात्र मध्येच खरजई रेल्वे गेट असल्याने रेल्वे आल्यावर वाहने अडकून पडतात. त्यामुळे बहाळला जाण्यासाठी मेहुणबारे मार्गे जा की खरजई मार्गे वेळ तितकाच लागतो.