आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - प्रेयसीला स्मोकिंग करण्याचे व्हिडिओ दाखवून बदनामी केल्याचा राग येऊन बॉबी (पूर्ण नाव माहित नाही) नावाच्या विद्यार्थ्याने प्रतापनगर येथील मोहित विजय बोरसे (वय 18) यास अपहरण करून रात्रभर मारहाण करत शारीरिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
मोहित हा मूजे महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभर त्याला पाच-सहा मुलांनी एका घरात कोंडून ठेवत मारहाण केली. बुधवारी रात्री त्याला सोडून दिल्यानंतर गुरुवारी मोहित उपचार घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. या वेळी मोहितने माध्यमांच्या प्रतिनिधींना त्याच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. रात्री उशिरा मोहितचे वडील झाल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला बसून होते.
मोहित बोरसेची आपबिती त्याच्याच शब्दात..
मी मंगळवारी सायंकाळी पिंप्राळ्यातील माझा मित्र अविनाश यादव याच्या घरी अभ्यासासाठी जात होतो. गुजराल पेट्रोलपंपाजवळ मला बॉबी व निखिल (पूर्णनाव माहित नाही), नरेंद्र पाटील, लोकेश सपकाळे, प्रतीककुमार पवार आणि यांनी गाठले. तेथे बॉबी, लोकेश यांनी मला मारहाण केली. त्यानंतर सर्वांनी मला रात्री 10 वाजता रामानंदनगर चर्चजवळील प्रतीककुमार याच्या घरी नेले. लोकेश तेथे आला नाही. मात्र, प्रतीकच्या घरी आदित्य पाटील, प्रसाद पाटील,नरेंद्र पाटील हे तिघे हजर होते. प्रतीकच्या घरी कोणीही नव्हते. तेथे मला बॉबी आणि नरेंद्र यांनी रात्रभर पडद्याच्या पाइपाने मारहाण करीत जखमी केले. या वेळी अविनाशही तेथे हजर होता. मी बॉबीच्या प्रेयसीला बॉबीचे सिगारेट पितांनाचे व्हिडिओ दाखविल्याचे त्यांनी माझ्याकडून वदवून घेत मोबाइलमध्ये त्याचे व्हिडिओ चित्रणही केले. बुधवारी सकाळी 9 वाजता मला घरी सोडले. 10 मिनिटात पुन्हा बाहेर ये, नाही तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकू, अशी धमकी बॉबीने दिली. मी घरात गेलो. कुणाला काहीच न सांगता भीतीपोटी बॉबीच्या गाडीवर येऊन बसलो. त्यांनी बुधवारी दुपारपर्यंत पुन्हा मला मारहाण केली अन् सायंकाळी सोडून दिले. त्यानंतर माझी तब्येत खराब झाल्यामुळे मी झोपून राहिलो. गुरुवारी दुपारी झालेला प्रकार मी घरी सांगितला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.