आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेव्हण्याकडून शालकाचे अपहरण; पोलिसांची हद्दीच्या वादात गुन्हा दाखल करण्यावरून टोलवाटोलवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शाहूनगरमधील युवकाचे त्याच्याच मेहुण्याने अपहरण करून खेडी येथे घेऊन जात गुरुवारी रात्रभर त्यास मारहाण करून शुक्रवारी सकाळी सोडून दिल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीडित युवक गुन्हा नोंदवण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात गेला असता पोलिसांनी सुरुवातीला वैद्यकीय तपासणीचा मेमो लिहिला. मात्र, घटना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे कळताच तो मेमो फाडून त्याला व त्याच्या बहिणीला गुन्हा जिल्हापेठ पोलिसात नोंदवण्यासाठी पाठवण्यात आले.

शाहूनगर येथील खलील सत्तार भिस्ती (वय 22) याची बहीण शरिफा हिचा 7 वर्षांपूर्वी सुरत येथील अन्वरनगरमधील इक्बाल बाला याच्याशी विवाह झाला होता. मात्र, इक्बाल गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो शरिफाला वागवत नसून ती तिच्या शाहूनगर येथील माहेरी राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. इक्बाल हा घरी येऊन नेहमीच 5 लाखांची मागणी करतो, जीवेठार मारून मुलीला घेऊन जाण्याची धमकी देत असल्याचा आरोप शरिफा हिने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केला.

पोलिसांची टोलवा टोलवी : याप्रकरणी खलील हा त्याची बहीण शरिफासह शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता गेला होता. सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय तपासणीचा मेमो दिला. मात्र, घटना जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीत घडल्याचे समजल्यानंतर त्यांनी मेमो फाडून टाकला. त्यांना जिल्हापेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पाठवले. जिल्हापेठ पोलिसात मात्र दुपारी 4 वाजेपर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.
रात्रभर केली मारहाण
गुरुवारी रात्री 8 वाजेदरम्यान खलील मजुरीचे पैसे वाटण्यासाठी विसनजी नगरमधील गुजरात स्वीट मार्टजवळ उभा असताना इक्बाल आणि त्याच्या 10 ते 12 साथीदारांनी त्याचे अपहरण करीत त्याला खेडी येथे घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यास रात्रभर मारहाण करून गंभीर जखमी केले. शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्याला पुन्हा जळगाव शहरात सोडून ते पळून गेले.