आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात बळावतोय ‘किडनी स्टोन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाढत्या तापमानासोबत ‘सर्वात जास्त थंड शहर’ अशी दुहेरी ओळख निर्माण झालेल्या जळगावचे नाव ‘किडनी स्टोन’मुळे (मुतखडा) वैद्यकीय क्षेत्रातही चर्चेचा विषय ठरत आहे. वाढते तापमान व क्षारयुक्त पाण्याच्या सेवनामुळे 100 रुग्णांमागे तब्बल 60 जण ‘किडनी स्टोन’च्या त्रासाने पीडित असल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच हे प्रमाण असेच राहिल्यास मधुमेह व रक्तदाबानंतर येणा-या मुतखड्याचा क्रमांक काही वर्षांत पहिला असेल, अशी चिंता व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांत जळगाव जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतीला तर दूरच, पिण्याचे पाणी मिळणेही अत्यंत कठीण झाले होते. यंदाही मे महिन्यापर्यंत वेगळी परिस्थिती नव्हती. त्यामुळे विहिरी व बोअरिंगच्या पाण्यावर वेळ मारून न्यावी लागत होती; परंतु खान्देशचा पट्टा क्षारयुक्त पाण्याचा ओळखला जात असल्याने त्याचा परिणाम काही वर्षांनंतर जाणवायला सुरुवात झाली आहे.

वाढते तापमान, शरीरातील कमी होणारे पाण्याचे प्रमाण व काही कालावधीनंतर पाण्याचे सेवन न करण्यासारख्या कारणांमुळे गेल्या दोन-तीन वर्षांत ‘मुतखडा’ आजाराचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण थोडेथोडके नसून, त्यात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी सोनोग्राफी करण्यासाठी येणा-या 100 रुग्णांपैकी 60 जणांमध्ये कमी-अधिक आकाराचे मुतखडे आढळून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच वाढत्या रुग्णांमुळे या आजारावर उपचार करणा-या डॉक्टरांचे प्रमाणही वाढल्याचे डॉक्टर सांगतात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी व अ‍ॅलोपॅथीनंतर शेवटचा पर्याय शस्त्रक्रियेचा मानला जातो.

काय आहेत उपाय ?
टोमॅटो, काकडी, वांगी व अन्य बियांच्या पदार्थ मांसाहाराचे प्रमाण कमी करणे, दररोज पाच लिटर पाणी पिणे,व्यायाम करणे व मिठाचे प्रमाण क मी करणे हे या विकाराच्या नियंत्रणासाठी योग्य उपाय आहे.

काय त्रास होतो ?
पोट व कंबर दुखणे, मळमळ होणे, उलट्या होणे, लघवीतून रक्त जाणे, लघवी अडकून अडकून होणे, लघवी वारंवार होणे यासारखे त्रास जाणवतात.

कशामुळे होतो त्रास ?
पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, डिहायड्रेशन, कॅल्शिअमच्या गोळ्या सेवन करणे, युरिक अँसिडचे रक्तातील प्रमाण वाढणे, हायपर थायरॉइडझम असणे यामुळे मुतखड्याचा विकार होतो.

खड्यांचे प्रकार
80 टक्के खडे हे कॅ ल्शिअमचे असतात. त्यातही काही कॅ ल्शिअम ऑक्झ्ॉलेट व कॅल्शिअम फॉस्फेटचे असतात. इन्फे क्शनमुळेही खडे तयार होतात. तसेच युरिक अँसिडमुळे खडे तयार होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासह ‘सिस्टीनचा खडा’ असे हे चार प्रकार आहेत.

ग्लोबल वॉर्मिंगचा फटका
पर्यावरणातील वाढत्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे पिण्याच्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती दरवर्षी अनुभवास येते. त्यातच कामाचा ताण व घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी घटते. यासारख्या अनेक बाबींमुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यातूनच मुतखड्याच्या विकारात वाढ होत आहे.

त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण जास्त
स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये मुतखड्याचे प्रमाण जास्त आहे. पूर्वी चार रुग्णांपैकी एकाला हा त्रास व्हायचा; मात्र आता चार जणांपैकी दोघांना हा त्रास जाणवतो. त्यासाठी क्षारमुक्त पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पावसाचे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुरवठा झाल्यास नागरिकांना बोअरिंग वा विहिरीचे पाणी पिण्याची गरज भासणार नाही, असेही डॉक्टर सांगतात.

तज्ज्ञ म्हणतात..
गेल्या काही वर्षांत हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यात पाणीटंचाईच्या काळात क्षारयुक्त पाण्याचे सेवन हे महत्त्वाचे कारण पुढे आले आहे. येत्या काही वर्षांत किडन्या खराब होण्याला मुतखड्याचा त्रास कारणीभूत ठरेल अशी स्थिती आहे. कारण 20 ते 25 टक्क्यांनी हे प्रमाण वाढले आहे. डॉ.आशिष पाटील, यूरोलॉजिस्ट, धुळे

गेल्या सात वर्षांत ‘किडनी स्टोन’च्या कित्येक रुग्णांवर उपचार केला आहे. दररोज 10 याप्रमाणे महिन्याला सरासरी 300 रुग्ण मुतखड्याच्या विकारामुळे उपचारासाठी येतात. पोटात दुखण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अनेक रुग्णांना नंतर मुतखड्याचा त्रास जाणवतो. डॉ.रितेश पाटील, होमिओपॅथीतज्ज्ञ

पूर्वी किडनीत दोष असेल त्यांनाच मुतखड्याचा त्रास व्हायचा. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे 12पैकी 9 महिने उन्हाळाच असतो. त्यामुळे उष्णता व घाम येतो. त्यातच पुरेसे पाणी पित नसल्याने क्षार तयार होऊन नंतर त्याचे खडे तयार होतात. त्याचे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे इतर विकारही होऊ शकतात. डॉ.अनिल पाटील, सर्जन

आमच्याकडे आलेल्या 100पैकी 60 रुग्णांमध्ये सोनोग्राफीनंतर ‘किडनी स्टोन’चे प्रमाण निदर्शनास येते. काहींना त्रास होतो, तर काहींना त्याचा पत्ताही नसतो. 12 वर्षांच्या कालखंडात ‘किडनी स्टोन’च्या रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, ही चिंताजनक बाब आहे. डॉ.प्रशांत देशमुख, सोनोग्राफीतज्ज्ञ