आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किड्या-मुंग्यांप्रमाणे जगू नका; उत्कृष्टतेचा ध्यास धरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- किड्या-मुंग्यासारखे जीवन जगू नका, सदा उत्कृष्टतेचा ध्यास धरा, पैसे खाऊन कुणीही मोठे होत नाही अन् चारित्र्याशिवाय काहीच मोठे नाही, असे प्रतिपादन माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले.
व.वा.सार्वजनिक वाचनालयाच्या नूतनीकरण केलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘मी एक विद्यार्थी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, वाचनालयाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष सुशील अत्रे, कोषाध्यक्ष अनिल शाह, कार्याध्यक्ष प्रताप निकम उपस्थित होते. याप्रसंगी अभ्यासिकेचे नूतनीकरण करणारे आरेखक ललित राणे यांचा इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी इनामदार म्हणाले, नक्षलवादी नेता कोंडापल्ली सीतारामय्या याला अटक करताना भीती वाटली नाही, दाऊदच्या अड्ड्यावर धाड टाकताना भीती वाटली नाही. अरुण गवळी, छोटा शकील यांना फटके मारताना भीती वाटली नाही. मात्र, युवापिढीसोबत बोलताना भीती वाटते, असे सांगत त्यांनी त्यांच्यावर संस्कार रुजवणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी सांगितल्या.

त्यांनी शेर,भगवद‌् गीतेचे वाक्य, चित्रपट गीते यांचा वापर करीत विनोदाचीही पेरणी केली. तासभर त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. युवापिढीला मार्गदर्शन करीत असताना ‘नभी तो मरणादशमी, केवलम् तुशीतम यशा’ या चारुदत्ताच्या वाक्याने सुरुवात केली. ज्या वेळेस मनुष्य उत्कष्टतेचा ध्यास घेतो, त्याचवेळेस मनुष्य मोठा होता. पैसे खाऊन कुणी मोठा होत नाही. अप्रतिम काम करा, लोक तुमच्याकडे अापोआप येतील. चारित्र्याने, कर्तृत्वाने जीवन घडवा. अत्यंत प्रामाणिक रहा अप्रतिम काम करा,असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, इनामदार यांच्या व्याख्यानादरम्यान पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना मोबाइलवर सतत कॉल येत होते. त्यामुळे ते मोबाइलवर बोलत होते. हे लक्षात येताच इनामदार यांनी तुम्हाला मोबाइलवर बोलायचे असेल तर बाहेर जाऊन बोला, अशा शब्दात त्यांना खडसावले.

निराशेत शिवाजी नावाच्या तीन अक्षरांची आठवण
ज्यावेळेस मी निराशेच्या गर्तेत जातो, त्या वेळेस शिवाजी या तीन अक्षरी नावांची आठवण करतो. त्यामुळे मला ऊर्जा मिळते. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचे निश्चयाचा महामेरू, असे सुरेख वर्णन केले आहे. तर शत्रू असावा तर शिवाजी महाराजांसारखा असे गौरवोद‌्गार औरंगजेब बादशाहने काढले होते. शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचे शौर्य नेहमीच प्रेरणादायी ठरते, असेही त्यांनी सांगितले.

चारित्र्यसद‌्गुणांची किल्ली
गीतेच्यापाचव्या अध्यायात सर्वांचे हीत रक्षण करणाऱ्याला मोक्ष मिळतो, असे सांगितले आहे. नशिबाच्या नावाने रडत बसू नका. प्रयत्न करा, सुखाच्या मागे लागून माणसे मोठी होत नाहीत. आलेल्या दु:खाचा स्वीकार करा. दिवसभरात काय चांगली कामे केलीत, याचे सायंकाळी मंथन करा. तुमच्या पाठीमागे लोक काय बोलतात, हे महत्त्वाचे आहे. मोहाला बळी पडू नका. मोहाच्या क्षणी जे सांभाळलं जातं, तेच चारित्र्य असते. सद‌्गुणांची किल्लीच चारित्र्य असते. जे झोपले, त्यांचे नशीब झोपते, जे चालतात, त्यांचे नशीबही चालते.