आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबातून आलेली किन्नू, केरळी गुलाबकश जळगावात दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- संत्री, मोसंबी, द्राक्षे, खरबूज, पेरू आणि बोरे अशी खास हिवाळ्यातील मेवा असलेली फळे बाजारपेठेत दाखल झाली आहेत. पंजाबातून आलेली किन्नू संत्री आणि केरळचा प्रसिद्ध गुलाबकश आंबादेखील बाजारपेठेत दाखल झाला आहे, जो ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. नियमित असलेली नागपूरच्या संत्रीला ग्राहकांची चांगली मागणी आहे. शिवाय डाळिंब आणि सफरचंदांची मागणी स्थिर आहे.

फळांची मागणी वाढली असताना आवक मात्र तेवढी नाही. त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे. हरितगृह, पॉलिहाऊस यांचा वापर वाढल्याने शेतकर्‍यांकडून बाराही महिने फळांचे उत्पादन होत असल्याने फळांची बाजारपेठ जोरात आहे. फळांची मागणीदेखील वाढल्याने शहरात मुंबईच्या वाशी बाजारातून बाजार समितीत रोज फळांच्या गाड्या येतात.

तेथून शहरात आणि जिल्हाभरात फळे विक्री होतात. हंगामातील फळांमध्ये रस, गर यांचा दर्जा उत्तम असतो. या फळांमध्ये 70 ते 90 टक्क्यांपर्यंत पाणी असते. त्याचबरोबर काबरेहायड्रेट्स, प्रोटिन्स, फॅट्स, अमिनो, आम्ले, खनिज आदी घटक पोषक असतात. सध्या शहरातील गोलाणी मार्केट, घाणेकर चौक, सुभाष चौक, सिंधी कॉलनी, बाजार समिती आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर फळांची विक्री होते.

किन्नू संत्री
पंजाबच्या किन्नू संत्रीचा आकार गोल, साल चोपडी असून ते चवदार आहे. सध्या संत्रीची 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे.

केरळी गुलाबकश
केरळी गुलाबकश आंबा 12 किलोच्या बॉक्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 120 ते 140 रुपये किलोप्रमाणे आंबा विक्री होत आहे.

मोसंबीलाही मागणी
रोज 50 क्विंटल मोसंबी होलसेल विक्रेत्यांकडे दाखल होते. तेथून जिल्हाभर पाठविली जाते. या वर्षी आवक कमी असल्याने भावही वाढले आहेत. चांगली मोसंबी 40 ते 50, तर लहान मोसंबी 30 ते 40 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.