आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्यात 38 हजार किचनशेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत फायबर किचनशेड उभारण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या फायबरच्या किचनशेडमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या असून ते फार काळ टिकणार नाही हे निदर्शनास आल्यानंतरही काम पूर्ण करावे लागते आहे. शासनाचा हा गजब प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्यात 38 हजार 48 किचनशेड बांधण्यात येणार होती. यासाठी घेरजी इस्टर्न लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार म्हणून व सिन्टेक्स इंडस्ट्रीजची ठेकेदार म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात फायबरचे किचनशेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या किचनशेडचे काम निकृष्ट असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण समिती सभापती रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणीदेखील केली होती. यात अनेक त्रुटी समोर आल्याने त्यांनी काम थांबवून विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला. सहा महिन्यानंतर जिल्ह्यात पुन्हा किचनशेडचे काम सुरू करण्यात आले.
काम करण्यापूर्वीच पैसे अदा
केंद्रशासनाची 2008-09 मधील योजना असून टप्प्याटप्याने तिचे काम सुरू होते. या कामाचे पैसेदेखील संबंधित एजन्सीला अदा करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाला विरोध केल्याने आहे ते काम देखील पूर्ण होणार नाही. तसेच न केलेल्या कामाचे पैसे देखील परत मिळणार नाही, ही बाब समोर आल्यानंतर शिक्षण सभापतींचा विरोध मावळला. यावरून शासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
475 शाळांमध्ये काम पूर्ण
जिल्हा परिषदेच्या 1807 शाळांमध्ये फायबरचे किचनशेड उभारण्यात येणार आहे. यापैकी 475 शाळांमध्ये स्वयंपाकगृह बांधण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित शाळांमध्ये किचनशेड उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून महिनाभरात हे काम पूर्णत्वास येणार आहे. फायबरचे तयार शेड शाळेत नेऊन बसविणे एवढेच काम ठेकेदाराला करावे लागते आहे.