आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरूण चौपाटीवर रंगला पतंगोत्सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गुजरातमध्ये संक्रांतीला भव्य प्रमाणात साजरा होणारा पतंगोत्सव जळगावातही गुजराथी समाज मंडळातर्फे छोटेखानी साजरा करण्यात आला. मेहरूण चौपाटीवर पतंग उडविण्याचा आनंद घेत ‘ढील दे ढील दे दे.. रे भय्या’, ‘उडी उडी रे पतंग’.. असे चित्र दिसून आले.
गुजराथी समाज मित्र मंडळातर्फे मकरसंक्रांतीनिमित्त गेल्या सात वर्षांपासून साजरा होणारा पतंगोत्सव यंदाही साजरा करण्यात आला. समाज बांधवांनी सकाळपासून मेहरूण तलाव परिसरात पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद उपभोगला. यात आबाल-वृद्धांनी सहभाग घेत लहानमोठे पतंग उडविले. त्यामुळे आकाशात वेगवेगळ्या रंगांचे पतंग ता-यांसारखे चमकत होते. एवढेच नव्हेतर या वेळी जोडीने पतंग उडविल्या गेल्या, यात महिलांचाही पुढाकार मोठ्या प्रमाणावर होता. एकमेकांच्या पतंग काटण्यासाठी चढाओढ सुरू होती. त्यामुळे पतंग काटाकाटीचा आनंद लक्षवेधक ठरला.
यात प्रोजेक्ट चेअरमन नैनेश पारेख, अशोक रावल, समाज मंडळाचे अध्यक्ष राजेश दोषी, राजेंद्र पिपरिया, तुषार दोषी, मनोज परमार, इंद्रबदन त्रिवेदी, मुकेश चव्हाण, दिलीप दोषी, शरद कोठारी, सुनील पटेल, नीलेश भाटिया, महेंद्र शहा यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मोफत बॉडी फिटनेस कॅम्प घेण्यात येऊन, त्याचा अनेक बांधवांनी लाभ घेतला.
केरळी ट्रस्टतर्फे ‘मकरा विळक्कू’ सण उत्साहात साजरा - शहरातील केरळी महिला ट्रस्टतर्फे स्वामी अय्यप्पा मंदिरात ‘मकरा विळक्कू’ उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात शेकडो दिव्यांची रोषणाई करण्यात आली. के रळमधील शवर्रामलय येथे स्वामी अय्यप्पा यांचे देवस्थान आहे. या ठिकाणी 14 जानेवारीला डोंगरात मोठी जत्रा भरते. यामुळे हा दिवस ‘मकरा विळक्कू’ सण म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मंदिराची सजावट करून शेकडो दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. या वेळी अय्यप्पा महाराजांची महादीप आराधना करण्यात आली. सायंकाळी सहस्त्राचार्य, आरती होऊन ‘खीर’चा प्रसाद वाटप करण्यात आला. ट्रस्टच्या अध्यक्षा वासंती अय्यर, उपाध्यक्षा शुभा वेणूगोपाल, रुही दामोधरन, जानकी दामोधरन यांनी परिश्रम घेतले. परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होती.
कारागृहात हळदी-कुंकू कार्यक्रम - मकरसंक्रांतीनिमित्त शहरात घरोघरी आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रम आणि पतंगोत्सवाची धमाल उडत आहे. मात्र, कारागृहातील महिला या आनंदापासून लांब राहू नये म्हणून महिला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांनीही संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी महिलांना भेट वस्तू व साड्या वाटप करण्यात आल्या. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा कारागृहात असलेल्या महिला कैद्यांसाठी संक्रांतीनिमित्त कार्यक्रम झाला. या वेळी कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, ज्योती ढोले, शांता वाणी, निवेदिता ताठे, उषा सरोदे, अ‍ॅड. प्रेरणा काळुंके, अर्चना पाटील, जयश्री नेरकर, कुमुद गुळवे, रजनी वाणी, शैला कासार या उपस्थित होत्या. या वेळी शांता वाणी आणि निवेदिता ताठे यांनी महिलांना साड्या वाटप केले. यमुनाबाई राठोड, छाया पाटील यांनी सहकार्य केले.