आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Handicap Shivaji Patil Making Best Film

अपंगत्वावर मात करीत चंदेरी दुनियेत रोवले पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिओमुळे डाव्या पायास आलेले अपंगत्व, त्यानंतर बालपणीच झालेल्या अपघातात उजव्या हाताची तीन बोटे तुटली. तरीही कलेची आवड असल्याने चंदेरी दुनियेत चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केलेय कोल्हापूर येथील शिवाजी पाटील यांनी.
शनिवारी ‘ओजस्विनी फिल्म फेस्टिवल’च्या उद्घाटनप्रसंगी ते शहरात आले होते. या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. खडतर परिस्थितीवर मात करीत त्यांनी ‘उद‌्घाटन’ हा ग्रामीण भागाचे दर्शन घडवणारा चित्रपट त्यांनी नवोदीत कलावंतांना घेऊन निर्माण केला आहे.

‘उद‌्घाटन’ चित्रपटाची निर्मिती
शिवाजी पाटील यांनी यापूर्वी अनेक शॉर्ट फिल्मचीही निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या फेस्टिवलमध्ये त्यांच्या शॉर्ट फिल्मस‌्ने सहभाग नोंदवला आहे. ‘उद‌्घाटन’व्दारे त्यांनी प्रथमच चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवले आहे. ते पेण येथील माध्यमिक शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

लहानपणापासूनच कलेची आवड
शाळेत असतानाच चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत. ती परदेशातील प्रदर्शनातही सादर करण्यात आली आहेत. महाविद्यालयीन काळात त्यांनी प्रसिद्ध कलाकारांची मिमिक्रीही केली. चित्रपटांबाबत प्रचंड उत्सुकता असल्याने त्यांनी त्याचे तांत्रिक शिक्षण घेतले आहे. कार्यशाळा घेऊन ते चित्रपटांबाबत मार्गदर्शनही करतात.

ज्ञान अन‌् आत्मविश्वासाने यश
आजपर्यंत मला माझ्या शारीरिक व्यंगाचा कधीही त्रास झालेला नाही, तो मी करूनही घेतला नाही. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही कामाचा कंटाळा करू नये. तांत्रिक माहिती संपूर्ण घ्यावी, प्रत्येकाने पुरेसे ज्ञान मिळवून ,आत्मविश्वासानेच काम करावे, असेही त्यांनी सांगितले.