आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डीच्या पीडित कुटुंबीयांनी घेतली अॅड. निकमांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांनी मंगळवारी कोपर्डीच्या कुटुंबीयांसह विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची जळगावातील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या पीडित कुटुंबीयाला धीर मिळावा म्हणून माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचे भय्यूजी महाराज म्हणाले. तर, या वेळी अॅड. निकम यांनी याविषयी कुठलीच भूमिका स्पष्ट केली नाही.

भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भय्यूजी महाराज म्हणाले, समाजात गुन्हे करणारी व्यक्ती कुठलीच भीती बाळगत नाही. मग अशा गुन्हेगारांना आपण घाबरवलं तर त्यात वाईट काय? आम्ही भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी शासनावर अवलंबून राहता कर्जत तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती सदृश आढळून येणाऱ्यांची यादी तयार करीत आहोत. कोपर्डी घटना ही अत्यंत निंदनीय अाहे. या कुटुंबीयाला धीर मिळावा म्हणून हे कुटंुबीय आपल्या मठात राहते आहे. भयमुक्त समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. यासाठी कर्जत तालुक्यात ८० विधवा परितक्ता भगिनींना प्रशिक्षण दिले आहे. या महिला आता महाविद्यालये, क्लासेस यांच्या बाहेर उभ्या असलेल्या मुलांचे फोटो काढतात. त्यांचे नाव, गाडीचा नंबर याच्या नोंदी घेतात. जेणेकरून टवाळखोरांवर वचक निर्माण हाेईल. यासाठी हे सुरू केले आहे. तसेच मद्य पिण्यासाठी येणाऱ्यांची नावे, त्यांनी किती प्रमाणात मद्य घेतले, याचीदेखील माहिती संकलीत केली जाते अाहे. गुन्हेगार सदृश असणाऱ्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. गुन्हे करणारे कुणालाच घाबरत नाहीत तर आपण त्यांनाच घाबरवलं तर त्यात वाईट काय? असे मत महाराज यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान सरकारी वकील म्हणून निकम हे कुटंुबीयांशी बोलले. मात्र, या वेळी निकम यांनी कुठलीही स्पष्ट भूमिका मांडली नाही.
भय्यूजी महाराजांनी केलेली वक्तव्ये
- शासन पॉर्न साइटवर बंदी आणू शकत नसेल तर सायबर सेल ऑब्जरवेशन करावे.
- अल्पवयीन ठरवण्याची मर्यादा कमी करून उपयोग नाही. सोशल मीडियामुळे १०-१२ वर्षाच्या मुलांनाही सर्व कळतं. शासनाने गुन्हे कसे कमी हाेतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
- तांडे, वस्ती भागात मुलींना पाच-सात किलोमीटर दूरपर्यंत शाळेत पायी जावे लागते. त्या भागात काटेरी झुडुपे, जंगल असते. अशा वेळी अप्रिय घटना घडू नये म्हणून मुलींना सायकल वाटप केले आहे. तसेच कोपर्डीमध्ये चार स्कूल बस दिल्या आहेत. त्यात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, मॅसेज अलर्ट यासारख्या सुविधा आहेत.

महाराजांची ही सदिच्छा भेट
भय्यूजी महाराज हे माझ्या घरी सदिच्छा भेट घेण्यासाठी आले होते. कोपर्डी घटनेच्या बाबतीत अद्याप काहीच बोलणे योग्य राहणार नाही. पोलिस तपास होऊन दोषारोप दाखल झाल्यानंतर माझे काम आहे. -अॅड.उज्ज्वल निकम
छायाचित्र: जळगावात अॅड निकम यांच्याशी चर्चा करताना भय्यूजी महाराज.
बातम्या आणखी आहेत...