आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कार्फबंदीसाठी पोलिसांना हवेय महाविद्यालयांचे सहकार्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यासह शहरात तरुणींच्या छेडखानीच्या घटना वाढत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नेहमी दंडुकशाहीचा धाक दाखविणाºया पोलिसांनीच आता गांधीगिरीचा मार्ग पत्करला आहे. तरुणींना स्कार्फ बंदीचे आवाहन केले आहे. महाविद्यालयांच्या परिसरात स्कार्फला प्राधान्य देऊ नका अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. त्यातच दिल्ली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर या घटना प्राधान्याने समोर येऊ लागल्या आहेत. या गंभीर घटना रोखण्यासाठी महिला महाविद्यालये व इतर महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. मात्र, तरी देखील हा प्रकार थांबता थांबत नसल्यामुळे व हे प्रकार तरुणी बांधत असलेल्या स्कार्फमुळेच अधिक फोफावत आहेत. पोलिसांनी हे प्रकार रोखण्यासाठी गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसच आवाहन करणार
कायद्याने प्रश्न सोडविण्यापेक्षा विनंती करून हा प्रकार थांबविणे अधिक चांगले राहील असा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी तरुणी, महिलांसह शाळा, महाविद्यालयांनादेखील स्कार्फ बंदीचे आवाहन करणार आहेत. महाविद्यालय प्रशासनाला पत्र पाठवून स्कार्फ बंदीची विनंती करण्याचे ठरविले आहे. स्कार्फ बांधलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेशच देऊ नका अशी विनंती त्यांनी केली आहे. यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थिनींना विचारपूस करणे गरजेचे असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
स्कार्फ बंदीबाबतची अंमलबजावणी प्रथम जळगाव शहरात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. जळगावातील सगळ्या शाळा, महाविद्यालयांना या अभियानात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. जळगावात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी दिले आहेत. अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक हेतू ठेवून या अभियानात अधिकाºयांनी काम करावे, असेही जयकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

गस्तदेखील वाढवणार
स्कार्फ बंदीचे आवाहन करण्यासोबतच महाविद्यालय परिसरात सध्या सुरू असलेली गस्तदेखील वाढविण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालय परिसरात आरसीपीमार्फत (अतिशीघ्र पोलिस पथक) गस्त घालण्यात येते. या परिसरांमध्ये महिला पोलिसांच्या आरसीपीमार्फत देखील गस्त घालण्यात येणार आहे. स्कार्फ बंदीबरोबरच गस्तीवरदेखील भर देण्यात येणार आहे.

छेडखानीला नक्कीच आळा बसणार
>छेडखानीच्या घटनांना महाविद्यालयीन तरुणींच्या चेहºयावर बांधले जाणारे स्कार्फही तेवढेच कारणीभूत आहेत. चेहरा स्कार्फखाली झाकला गेल्यामुळे तरुणी कोण आहे हे ओळखणे अवघड होते. त्यामुळे स्कार्फ बंदीचे आवाहन आम्ही केले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी योग्यरित्या झाल्यास नक्कीच छेडखानीच्या घटनांना आळा बसेल.
-एस.जयकुमार, पोलिस अधीक्षक