आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपानंतर जणू संपूर्ण नेपाळच उतरले रस्त्यावर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नेपाळमधील जनता आणि पर्यटक सर्वच रस्त्यांवर होते. प्रत्येक जण भयभीत सुखद अशा संमिश्र नजरेने येणार्‍या प्रत्येक वाहनाकडे पाहत होता. संपूर्ण नेपाळवासीय पायी चालणारे... चालून थकल्याने बसलेले... रात्री रस्त्यांच्या कडेला झोपलेले असे चित्र होते. जिकडे पाहावे तिकडे कोसळलेल्या इमारती, भेदरलेल्या नजरा. मात्र, तरीही आपल्या देशात आलेला पर्यटक त्याच्या मायदेशी सुखरूप जावा. तसेच ‘हमारे देश का नाम खराब होना नहीं चाहिए साहब!’ म्हणत प्रत्येक नेपाळी नागरिक धडपडत होता. हे चित्र पाहून माणुसकीच्या या अनोख्या रूपाने आमच्या सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले होते. आज आठ दिवसांनंतरही ते चित्र डोळ्यांसमोर आल्यावर मन स्तब्ध झाल्यावाचून राहत नाही, असा अनुभव नेपाळमध्ये आलेल्या आपत्तीतून सुखरूप परतलेल्या जळगावच्या लक्ष्मीनारायण मंडोरे यांनी ‘दिव्य मराठी’कडे कथन केला.

मंडोरे म्हणाले की, आम्ही दोन क्रुझर गाड्यांनी नात्यातील सुमारे २०-२२ जण १५ एप्रिलला जळगावहून नेपाळ दर्शनासाठी निघालो होतो. २४ एप्रिल रोजी नेपाळच्या हद्दीत प्रवेश केला २५ रोजी जनकपुरू येथे मुक्काम केला. सकाळी पशुपतिनाथकडे निघालो. मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास डोंगरावर वादळासारखे काहीतरी दिसले. मात्र, धावत्या गाडीत ते विशेष जाणवले नाही. थोड्या वेळाने रस्त्याच्या बाजूला डोंगरावरील घरे कोसळलेली दिसली अन् अचानक आमचे मोबाइल बंद पडले. त्यामुळे काय झाले हे समजत नव्हते. आमची गाडी नारायणगावाच्या दिशेने धावत होती. जसजसे पुढे जात होतो तसतसे लोकांचे लोंढे, गाड्यांची संख्या वाढत होती. काही जणांनी आम्हाला हाताने इशारा करून तोडक्या-मोडक्या हिंदीत गाडी थांबवून निसर्गाचा प्रकोप झाल्याचे सांगितले.

अर्ध्या तासात दहा पावले पुढे सरकले वाहन
नारायणगावाजवळी लघाटात वाहतूक कोंडीमुळे पुढे जाणे शक्य नव्हते. अर्ध्या-पाऊण तासात वाहन दहा पावलेच पुढे सरकले होते. सारे काही अघटित होते. तर संपर्काचे काेणतेही साधन नव्हते. स्थानिक नागरिकांशी भाषेअभावी नीट संवादही होत नव्हता. तीन तासांनी गाड्यांच्या रांगेत असलेल्या भारतीयांशी बोलल्यानंतर संपूर्ण नेपाळमध्ये मोठा भूकंप झाल्याची माहिती मिळाली. त्या वेळी पुढे १५ किलोमीटर मागे किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तेथून पशुपतिनाथ ८० किलोमीटर दूर होते.

...अन् परतण्याचा निर्णय घेतला
पुढे जाणे धोक्याचे ठरेल, असा सल्ला स्थानिक नेपाळींनी आम्हाला दिला. सोबत वृद्ध मंडळी असल्याने आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. गाडी वळवण्यास एक तास लागला. परतीच्या प्रवासात रस्त्यावरील नागरिकांची वाहनांची संख्या तिपटीने वाढली हाेती. २६ एप्रिल रोजी पहाटे वाजता आम्ही रेकसेलर बॉर्डरवर पोहोचलो. तेथे भारतीय सैन्याने विचारपूस केली, असे मंडोरे यांनी सांगितले.

देशाच्या नावासाठी सर्व काही
ठिकठिकाणी साहब, मेमसाहब, आप बच गये, ये बहुत अच्छा हुआ! आप लौट जाओ, अशा प्रकारे रिक्षाचालक, वाहतूक पोलिस वृद्ध नेपाळी नागरिक आम्हाला धीर देत हाेते. त्यामागे नेपाळचे नाव खराब होऊ नये, हा उद्देश असल्याचे एका रिक्षाचालकाने सांगितले. -दीपा मंडोरे