आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Kolhe News In Marathi, MNS, BJP, Jalgaon, Lok Sabha Election

ललित कोल्हेंच्या भाजपप्रेमामागे विधानसभा लक्ष्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभेत केलेल्या मदतीचे फळ आगामी विधानसभा निवडणुकीत मिळेल, या अपेक्षेने मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे हे महायुतीच्या व्यासपीठावर पोहोचले. कारण खाविआकडून भाजपविरोधात काम होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शहरातील भाजपची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा कोल्हेंचा प्रयत्न आहे.


महायुतीच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांची व्यासपीठावरील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. या घडामोडींची दखल मनसेच्या पक्षर्शेष्ठींनी घेतली गेली आहे; परंतु कोल्हेंचे असे वागणे आगामी काळातील राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांची खान्देश विकास आघाडी राष्ट्रवादीला मदत करेल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकांचा अनुभव पाहता परिस्थिती काहीही असली तरी, शहरातील भाजपचे मताधिक्य कमी होण्याची भीती व्यक्त केली जातेय. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुकीत आपली ताकद लक्षात आल्याने व लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला मदत केल्यास त्याचा फायदा आगामी काळात आपल्याला होईल, असा विचार कोल्हेंच्या मनात असावा. कारण मनसे विधानसभेच्या सर्व जागा लढण्याची शक्यता असून, त्यासाठी जळगाव शहरातून कोल्हे मनसेकडून कामाला लागले आहेत. भाजपच्या व्यासपीठावर जाऊन ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे कोल्हेंनी भाजपला आपलेसे करत मन जिंकण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. तथापि, मनसेच्या नेत्यांकडून या घडामोडींची किती गांभीर्याने दखल घेतली जाते, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
जुन्या निवडणुकांचा संदर्भ : जळगाव विधानसभेच्या सन 2002च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सुरेश जैन यांना 57 हजार 857, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या चंद्रकांत सोनवणेंना 55 हजार 305 मते मिळाली होती. जैन यांचा केवळ अडीच हजार मतांच्या फरकाने विजय झाला होता. त्या वेळी सोनवणेंच्या प्रचारासाठी भाजप पूर्ण ताक दीने उतरली होती. भाजप पाठीशी राहिल्यास जैन यांच्याविरोधात चांगली मते खेचता येऊ शकतात, हे पूर्वीच्या निवडणुकांवरून स्पष्ट होत असल्याचे कोल्हे जाणून आहेत.


राज ठाकरेंचा करिश्मा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यभरात असलेला करिश्मादेखील कोल्हेंना फायदेशीर ठरू शकतो. आता तर मनसेचे 12 नगरसेवक पालिकेत निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढली आहेच. त्यासोबत जातीय समीकरणांचा फायदाही त्यांना होऊ शकतो. त्यात सुरेश जैन यांच्याऐवजी दुसरा उमेदवार राहिल्यास चित्र आणखी वेगळे असू शकते. ही राजकीय गणिते मनाशी बांधलेल्या कोल्हेंनी त्यामुळेच भाजपशी हातमिळवणी केलेली असू शकते.