आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land Acquisition For Road Expansion Issue At Jalgaon, Divya Marathi

महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महसूल विभागातर्फे नव्याने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या टप्प्यात भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यात भूसंपादन केले जाणार आहे. दोन्ही तालुक्यांमधील 940 शेतकर्‍यांचे एकूण 3 लाख 17 हजार 931 चौरस मीटर क्षेत्र संपादित होणार आहे.

धुळे-अमरावती दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी महसूल विभागातर्फे शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. महामार्ग चौपदरीकरणासाठी यापूर्वीही भूसंपादन झालेले आहे. मात्र, कामासाठी वाढीव जमिनी आवश्यक असल्याने नव्याने भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे अधिसूचना जारी करण्यात आली आहे.भुसावळ तालुक्यातील 711 तर मुक्ताईनगर तालुक्यातील 229 शेतकर्‍यांची जमीन महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. त्यादृष्टीने महसूल विभागातर्फे नियोजनाला गती देण्यात आली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील संपादित क्षेत्र
मुक्ताईनगर तालुक्यातील 504 शेतकर्‍यांचे एक लाख 76 हजार 341 चौरस मीटर क्षेत्र संपादित झाले आहे. तर 55 हजार 923.88 चौरस मीटर क्षेत्राचा ताबा घेण्याची प्रक्रिया बाकी आहे. 147 शेतकर्‍यांना 23 कोटी 23 लाख 35 हजारांचा मोबदला देण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. तर 357 शेतकर्‍यांचे एक लाख 29 हजार 417.12 चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व शेतकर्‍यांना पाच कोटी 70 लाख 48 हजार रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. ज्या शेतकर्‍यांचा मोबदला घेणे बाकी आहे. त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुरू केली आहे.

भुसावळ तालुक्यातील संपादित क्षेत्र
भुसावळ तालुक्यातील तब्बल 1275 शेतकर्‍यांचे चार लाख 90 हजार 553.87 चौरस मीटर क्षेत्र यापूर्वी संपादित करण्यात आले आहे. तर एक लाख 86 हजार 185.98 चौरस मीटर क्षेत्राचा ताबा घेण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. लवकरच ती पूर्ण होणार आहे. 669 शेतकर्‍यांना 13 कोटी 68 लाख 97 हजारांचा मोबदला देण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. तर 606 शेतकर्‍यांचे तीन लाख चार हजार 367.89 चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व शेतकर्‍यांना 14 कोटी 88 लाख सहा हजारांचा मोबदला देण्यात आला आहे.भुसावळ तालुक्यातील 606 शेतकर्‍यांना 14 कोटी 88 लाखांचा मोबदला