आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ले-आउट’ मंजुरी आधीच विकास; खुल्या जागा हडप झाल्यानंतर मनपाला आली जाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा गिळंकृत करण्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने त्याला लगाम लावण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी काळात ‘ले-आउट’ मंजुरीसाठी आल्यानंतर आधी खुल्या जागेचा विकास संबंधित ठेकेदाराकडून करवून घेतला जाणार असल्याची माहिती नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम यांनी दिली. 59 संस्थांवर कारवाई अटळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने देखभाल व सार्वजनिक हितासाठी हस्तांतरीत केलेल्या 59 जागांचा मंगल कार्यालय, शाळा, पतसंस्था यासारख्या व्यावसायिक कारणासाठी वापर सुरू आहे. याची दखल घेत पालिका आयुक्तांनी संबंधित संस्थाचालकांना नोटीस बजावून जागा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. नोटीस बजावली म्हणजे कारवाई अटळ आहे. 397 पैकी 59 संस्थांवर कारवाई केली जात असली तरी अन्य जागांची माहिती घेत असल्याचे सहायक संचालक निकम यांनी सांगितले. पालिकेच्या जागांचा गैरवापर वाढत असल्याने स्थानिक नागरिकांवर त्याचा अन्याय होतो. ले-आउटमधील रहिवाशांच्या वापरासाठी या जागांचा वापर होणे अपेक्षित आहे. परंतु खासगी मालमत्ता समजून नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार घडतोय. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आगामी काळात पालिका प्रशासन मंजुरीसाठी ले- आउट आल्यास खुल्या जागेचा विकास करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवणार आहे. तशी तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
कर्मचारी संघटनेकडून चौकशीची मागणी
शहीद भगतसिंग जळगाव महानगरपालिका कामगार क र्मचारी संघटनेने आयुक्तांना 18 जून रोजी निवेदन दिले आहे. त्यात पालिकेच्या मालकीच्या काही खुल्या भूखंडावर काही बिल्डर्सने संस्थेच्या नावाखाली कमर्शिअल बांधकाम व मंगल कार्यालय बांधले आहे. तसेच प्रतिदिन मंगल कार्यालयाचे भाडे 10 ते 15 हजार रुपये आकारले जात आहे. अशा अनधिकृतपणे बांधलेल्या मंगल कार्यालयांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनासोबत लाडशाखीय वाणी विकास मंडळाच्या सुमंगल कार्यालयाची 15 हजारांची पावतीची छायांकित प्रत जोडली आहे.
विकसित करणार
खुल्या जागेचा पाया भरून त्यावर तारेचे कुंपण करून घेतले जाणार आहे. तसेच अशा जागेत वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाक व मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसवण्याची सक्ती केली जाणार आहे. त्यामुळे जागेचा वापर योग्य कारणांसाठी होऊ शकणार आहे.
महेश प्रगतीची जागा खासगी
रिंगरोड येथील श्री महेश प्रगती मंडळाचा हॉल, मंगल कार्यालयासाठी असलेली जागा खासगी मालमत्ता आहे. तिचा महापालिकेशी काही संबंध नाही, असे मंडळाच्या ट्रस्टीनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
पुढे काय ?
पालिकेतर्फे खुला भूखंड का काढून घेऊ नये, अशी नोटीस 81 अ प्रमाणे बजावली आहे. या नोटिसीला सात दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे. हे उत्तर समाधानकारक न आल्यास 81 ब (2) प्रमाणे नोटीस बजावली जाऊ शकते. या नोटिसीनुसार भूखंडांचे ठराव निष्कासित केले जाऊ शकतात.