आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूसंपादनाअभावी तिसर्‍या रेल्वेलाइनच्या कामाला ब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुसावळ येथून मुंबई, सुरतकडे जाणार्‍या प्रवासी आणि मालगाड्यांची संख्या वाढल्याने भुसावळ ते जळगावदरम्यान तिसर्‍या रेल्वे लाइनच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने गेल्या दोन वर्षांपूर्वीच मंजुरी दिली होती. 24 किलोमीटर अंतराच्या या रेल्वे मार्गासाठी एकूण 140 कोटी रुपये खर्च लागणार आहेत.

भुसावळ ते भादलीपर्यंत अपमार्ग, तर भादली ते जळगावदरम्यान डाऊन मार्गाकडून नवीन ट्रॅक टाकण्यात येईल. प्रामुख्याने सुरतकडे जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवासी तसेच मालगाड्यांसाठी तिसरी लाइन महत्त्वाची ठरेल. मात्र, हे काम पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या भूसंपादन प्रक्रियेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार पाठपुरावा करूनही महसूलकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पात खोडा घुसला आहे.

विशेष म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी सरकार महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर हायस्पीड ट्रेन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे भुसावळ-जळगावदरम्यान तिसर्‍या रेल्वे लाइनमधील अडथळे दूर करण्यासाठी रावेरच्या खासदार रक्षा खडसे आणि जळगावचे खासदार ए.टी.पाटील दुर्लक्ष करत आहेत. या लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून भूसंपादनाचा तिढा लवकर सोडवल्यास रेल्वे दळणवळण अधिक जलद होण्यास मदत होईल. यासाठी संयुक्त बैठक घेणे अपेक्षित आहे.
पत्राद्वारे विचारणा
तिसर्‍या रेल्व लाइनसाठी भूसंपादन करावे, असा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिला आहे. याबाबत विचारणा केली असता केवळ प्रस्तावातील त्रुटी सांगितल्या जातात. दरम्यान, भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे निधी उपलब्ध आहे. मात्र, भूसंपादन न झाल्याने त्याचा उपयोग नाही.
निधी परत जाणार
तिसर्‍या रेल्वेमार्गाच्या कामासाठी रेल्वे मंत्रालयाकडून यंदाच्या बजेटमध्ये किमान 15 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, कामाला सुरुवातच झालेली नसल्याने ही रक्कम तीन कोटींनी कमी झाली. आता 12 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून या निधीतूनही काम सुरू न झाल्यास पैसा परत जाण्याची शक्यता आहे.
4 कि.मी. जमीन
भुसावळ ते भादलीपर्यंत तिसर्‍या लाइनसाठी भूसंपादनाची गरज नाही. मात्र, भादली ते जळगावदरम्यान ही लाइन डाऊन साइडने असेल. भादली रेल्वेस्थानकाजवळ गेटवर उड्डानपुलाची निर्मिती होऊन तिसरा मार्ग त्यावरून जाईल. तसेच भादली ते जळगावदरम्यान रेल्वेला चार किलोमीटर अंतराचे भूसंपादन करावे लागणार आहे.
रेल्वेचा पाठपुरावा सुरू आहे
रेल्वे प्रशासनाकडून तिसर्‍या रेल्वे लाइनच्या कामासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात असून जमीन संपादनाचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष काम हाती घेऊ. यासाठी प्राप्त निधी पडून आहे.
एस.के.जैन, सहायक कार्यकारी अभियंता (निर्माण), भुसावळ
नवीन कायद्यानुसार प्रस्ताव द्या
भुसावळ रेल्वे विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूसंपादनासाठी प्रस्ताव आला आहे. मात्र, हा प्रस्ताव भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार हवा, असे संबंधितांना सांगितले आहे. त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करता येणार नाही.
राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), जळगाव