आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land Aqusation Issue In Dhule City For Development

धुळे शहराच्या विकासासाठी भूसंपादनाचे सात प्रस्ताव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील विकासकामांसाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने सात प्रस्ताव उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. नगरोत्थान योजनेंतर्गत महापालिकेने ही कार्यवाही सुरू केली आहे. या भूसंपादनाच्या प्रस्तावावर निवाडा झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

शहरात नगरोत्थान योजनेत रस्ते, गटारी, पथदिवे ही कामे घेण्यात येणार आहेत. यामध्ये गतवर्षी शहरातील नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी मिळाला होता. त्यानंतर रस्त्यावरील दुभाजक बगिच्यांना संरक्षण भिंत बांधण्यासारख्या कामांचा समावेश करण्यात आला. नगरोत्थानाच्या योजनेतून ऐंशी, शंभर फुटी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यानंतर हा निधी मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनीही तसे पत्र दिले आहे. त्याप्रमाणे महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरात विविध कारणांसाठी जागेचे आरक्षण केले आहे. त्यानुसार भूसंपादन झाले आहे. भूसंपादनाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय अंतिम निवाडा होणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नगरोत्थान निधीचा उपयोग होणार आहे.

निधीही दिला
शहरात केलेल्या भूसंपादनात कोरकेनगरात २४ लाख ६२ हजार रुपयांचे भूसंपादन आहे. सोसायटी पेट्रोल पंपामागे क्रीडांगणासाठी ६३ लाख ७२ हजार रुपयांचे भूसंपादन करावयाचे आहे. त्यातील एक लाख ७१ हजारांची रक्कम महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. वलवाडी जवळील केशवनगर भागात क्रीडांगणासाठी आरक्षण करून ६१ लाख तीन हजार रुपयांचे भूसंपादन करावयाचे आहे.
महत्त्वाच्या जागांकडे दुर्लक्ष
निधी अभावीशहरात महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या मोक्याच्या जागा विकसित होत नाही. महापालिकेच्या या जागा आहेत. त्यावर विकासात्मक कामे झाली तर शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच पालिकेचे उत्पन्नही वाढेल; परंतु या जागांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे इतर ठिकाणी भूसंपादनाची गरज भासते. रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादन योग्य आहे. मात्र, इतर कामांसाठी महापालिकेच्या जागांचा वापर व्हायला हवा. त्याशिवाय या जागा अतिक्रमणातून मोकळया होणार नाहीत, याची काळजी पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.
चक्कर बर्डीला वाहतूक बेट
शंभर फुटी रस्त्यासाठी जमनागिरी, वैभवनगर या भागातील तीन ठिकाणी भूसंपादन करावयाचे आहे. त्याचप्रमाणे चक्करबर्डी येथे वाहतूक बेट तयार करण्यासाठी भूसंपादन करावयाचे आहे. याप्रकारे शहरातील जागेवर आरक्षण ठेवून त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासाठी एकूण तीन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम संबंधित जमीन मालकांना द्यावी लागणार आहे. त्यासाठी तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यातील केवळ ७४ लाख रुपये साधारणपणे मनपाने दिले आहेत.