आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डरांनी हडपलेल्या भूखंडाचा शोध सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आशाबाबानगरयेथे बिल्डरांनी हडपलेल्या भूखंडाचा शासकीय यंत्रणेकडून शोध सुरू झाला आहे. ‘दिव्य मराठी’ने सोमवारी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तहसीलदारांनी आशाबाबानगरात जाऊन संबंधित जागेचा शोध घेतला तर दुसरीकडे पालिकेच्या नगररचना विभागानेही संबंधित जागेवरील बांधकाम परवानगीच्या फायलींचा अभ्यास सुरू केला आहे. दोन्ही बाजूने केलेल्या अतिक्रमणात शासकीय भूखंड हडप केल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे. त्या जागेचा शोध घेण्यासाठी तातडीने कारवाई सुरू झाली आहे.
आशाबाबानगरातील गट क्रमांक ५७/१/३ या सुमारे एक एकर जागेवर बिल्डर लॉबीकडून अतिक्रमण झाले असून मूळ भूखंडच गायब झाला आहे. उताऱ्यावर शासकीय मालकीचे ४० आर क्षेत्र प्रत्यक्ष जागेवरून गायब झाले आहे. नेमके क्षेत्र गेले कोठे याबाबत प्रशासनही उदासीन होते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने त्यांच्या मालकीच्या जमिनीचा शोध सुरू केला आहे. तहसीलदार गोंविद शिंदे यांनी दुपारी आशाबाबानगर येथे जाऊन गट क्रमांक ५७/१/३ या जागेचा शोध घेतला. उताऱ्यावरील जागेचा शोध लागत नसल्यामुळे तहसीलदारांनी तलाठ्यांना जागा मोजणीचे आदेश दिले. यासंदर्भात भूमिअभिलेख विभागाला पत्र देण्यात येणार आहे.
- जमिनीची मोजणी करून त्यावरील अतिक्रमण काढले जाईल.जागेची मोजणी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. मोजणीबाबत मंगळवारी भूमिअभिलेख विभागाला पत्र देणार आहे. गोविंदशिंदे, तहसीलदार.
-बनावट कागदपत्रे देऊन शासकीय जमिनीवर बांधकाम केलेले असल्याचा शोध घेणार आहोत. संबंधितांवर पालिकेमार्फत कारवाई करणार. संजयकापडणीस, आयुक्त,महापालिका.

दुसऱ्या गटाच्या नावे परवानगी
शेजारीअसलेल्या दुसऱ्या गट क्रमांक भूमापन क्रमांकाच्या नावे अतिक्रमित जागेवर बांधकाम परवानगी घेतल्याचा संशय वाढला आहे. यासंदर्भात पालिकेच्या नगररचना विभागाने फायलींचा शोध सुरू केला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून परवानगी घेतल्याचा संशय असल्याने सखोल चाैकशी करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे.