आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायापालट: जळगावनजीकचे रम्य स्थळ लांडोर खोरे कात टाकणार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यातील अनेक स्थळे वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. केवळ विकासाअभावी त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. वनविभागांतर्गत येणार्‍या अशा स्थळांचा चेहरामोहरा आता बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात शहरातील मोहाडी रस्त्यावरील लांडोरखोरी परिसराचा समावेश आहे. तेथे नागरिकांना ‘मॉर्निंग वॉक’साठी स्वतंत्र पाऊलवाट तयार केली जाणार आहे. त्यामुळे पहाटे फिरणार्‍यांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. तसेच पद्मालय येथील भीमकुंडाला वेगळा ‘लूक’ देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

असा आहे आराखडा : जळगाव वन विभागातर्फे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून लांडोरखोरीत निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात येणार आहे. वनविभागांतर्गत लांडोरखोरीचा परिसर 70 हेक्टर क्षेत्र आहे. तेथे दोन मीटर रुंदीची सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराची पाऊलवाट तयार करण्यात येणार आहे. खडी आणि वाळूचा वापर करण्यात येणार आहे. चालण्यासाठी व्यवस्थितपणे जागा तयार करण्यात येणार आहे. यासाठी डीपीडीसीतून सुमारे 16 लाख 75 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यांना होईल उपयोग : नागरी वस्ती वाढल्याने पूर्वी शहराच्या बाहेर असलेल्या लांडोरखोरी परिसराचा आता शहरात समावेश होत आहे. शहराचा शेवटचा भाग म्हणून महाबळ, मोहाडीनगर, मायदेवीनगर, आदर्शनगर, गणपतीनगर आदी परिसरातील नागरिक पहाटे व सायंकाळी मोहाडी रस्त्यावर फिरायला जात असतात. सकाळी फिरणार्‍यांमध्ये बहुतांश डॉक्टर, वकील, व्यापारी, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षक आदींचा समावेश आहे. ‘मॉर्निंग वॉक’साठी जाणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वनविभागाने लांडोरखोरीच्या भिंतीला लागून पाऊलवाट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध हवा मिळण्यास मदत होणार आहे.

असे पडले लांडोरखोरी नाव : शहराला लागून असलेल्या लांडोरखोरीच्या नावाबाबत अनेकांना प्रश्न पडतो. या वनक्षेत्रात पूर्वीच्या काळात मोर व लांडोरचे वास्तव्य मोठय़ाप्रमाणावर होते. आता त्यांचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यातूनच या वनक्षेत्राला लांडोरखोरी असे नाव दिले गेले आहे.

जागेचा वाद न्यायालयात : वनविभागाच्या जागेवरून काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता. तो वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. लांडोरखोरी परिसरातील 3600 मीटरपैकी 3200 मीटरचे मोजमाप झालेले आहे. 400 मीटरचा वाद आहे. न्यायालयाच्या आदेशाने तो वाद मिटविला जाईल.