आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांपासून शिक्षकांना वेतन नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - जिल्ह्यातील काही शाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत असून, काही शाळेचे कर्मचारी चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. शिक्षण विभागाशी वारंवार संपर्क साधूनही नियमित वेतन होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

याबाबतीत वेतन आणि भविष्यनिर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी या संघटनेने निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, दरमहा तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन व्हावे, हे शासनाचे धोरण आहे. दरमहा वेतन तर मिळत नाहीच उलट चार ते पाच महिन्यांपासून सर्व कर्मचारी विनावेतन काम करीत आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन थांबवू नये, असे धोरण असताना वेतन अदा करण्यात आलेले नाही. हा केवळ कर्मचारी वर्गाशी त्यांच्या भावनांशी चालवलेला खेळ आहे. दरमहा वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे विमा हप्ते, गृहकर्ज, कर्जाचे हप्ते भरता येणे अशक्य झाले असून, सामाजिक प्रतिष्ठेलाच धोका पोहोचत आहे.

दरम्यान निवेदनाची तातडीने दखल घेण्यात यावी, अन्यथा टीडीएफ संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील, टीडीएफचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, नंदुरबार शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब पुना पाटील, कार्यवाह मधुकर माळी, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे कार्यवाह पी. जी. बागुल, मुख्याध्यापक संघटनेचे कुंदन पाटील समन्वय समितीचे एन. डी. नांद्रे, कलाशिक्षक राजेंद्र ठाकूर, उपशिक्षक एन. डी. पाटील आदी उपस्थित होते.

प्रलंबित मागण्या
>दिलेल्या कागदपत्रांची पोच अर्थात पगार बिलाची पोच मिळावी.
>पीएफ स्लिपा वेळेवर मिळाव्या.
>तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र मास्टर ट्रेनर मिळावा.
>प्लॅन ऑफलाइन बिल नियमित मंजूर करावे.
>ऑफलाइन ऑनलाइन बिल एकाच दिवशी पारित करावे.