आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात गेल्या दीड वर्षात एक टक्काही सिंचन नाही, पवारांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यकर्त्यांनी पाण्याचे धोरण ठरवण्यात क्रमांक एकवर असले पाहिजे. सत्ता येते अन् जाते. सामाजिक बांधिलकी सुटत नाही. राज्याला पाण्याची गरज असताना गेले दीड वर्ष केवळ रखडलेल्या प्रकल्पांवर चर्चा होत आहे. मात्र, गुंतवणूक केली जात नाही. या कालावधीत एक टक्काही सिंचन (इरिगेशन) झाले नसल्याचे समोर आले आहे. हे चांगले लक्षण नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर टिप्पणी केली.

जैन हिल्स येथे राष्ट्रीय डाळिंब परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री एकनाथ खडसे अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री पतंगराव कदम, खासदार ईश्वरलाल जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे,अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, निवडणुकीत एकमेकांविरोधात टीका टिप्पणी होत असते. मात्र, शेतीला पाणी एक विचाराने दिले जाईल, यासाठी सामुदायिक प्रयत्न हवा. यासाठी सरकारला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी आहे. कुठल्याही विभागाचा ब्लॅक लॉग कायम रहाता कामा नये. तेथे पैसे खर्च करा, विदर्भात खर्च करा. एकेकाळी राज्यात स.ग.बर्वे यांच्या कार्यकाळात पाण्याचा वापर कसा करावा, असे धोरण ठरवण्यात आले होते. त्यामध्ये पाण्याच्या प्रश्नाबाबत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात लक्ष दिले नाही तर आत्महत्या व भूकवाढीचे चित्र बघायला मिळेल, असे नमूद करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी व दुष्काळातून सुटका करण्यासाठी सर्व सहकार्य करायला तयार आहे.

जळगाव देशातील शेतकऱ्यांची पंढरी : जळगाव देशातील शेतकऱ्यांची पंढरी बनले आहे. शेतीचे संशोधन व मार्गदर्शन केंद्र जळगाव झाले अाहे. या केंद्रातली जैन हिल्स पंढरी असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तसेच याप्रसंगी भवरलाल जैन यांची उणीव भासत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. गहू व तांदूळ पिकवणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारने प्रोत्साहन द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शरद पवारांच्या केळीलाही फटका
जळगावचा शेतकरी उत्तम केळी पिकवणारा आहे. त्या उदाहरणादाखल त्यांनी समोर बसलेले भागवतराव पाटील व इतर प्रगतिशील शेतकऱ्यांचा नामोल्लेख आपल्या भाषणात केला. मात्र, तापमानवाढीचा केळीला फटका बसला आहे. माझ्याही केळीला हा फटका बसला. मला ७५ टक्के केळी ३ रुपये किलोने विकावी लागली. तुमची अाणि माझी परिस्थिती सारखीच अाहे, असे पवार शेतकऱ्यांना यावेळी म्हणाले.

फळबागांच्या पुनरुर्जीवनासाठी १२१ कोटींचा प्रस्ताव : खडसे
आत्महत्या, नापिकीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देणे महत्त्वाचे आहे. डाळिंब टिश्युकल्चरच्या अनुदानासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करीत आहे. कमी पाऊस, रोगराई व तापमानामुळे नुकसान झालेल्या फळबागांच्या पुनर्जीवनासाठी केंद्र सरकारकडे १२१ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी डाळिंब परिषदेत दिली.

१०० टक्के अनुदानावर फळबाग : 'मनरेगा'च्या माध्यमातून १०० टक्के अनुदानावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. राज्यात एक लाख हेक्टरवर लागवड होईल. त्यासाठी कृषी अधिकाऱ्याला १० हेक्टरची मर्यादा दिली जाणार आहे. विद्यापीठ टिश्युकल्चरला मान्यता देत नाही. त्यांच्या मान्यतेशिवाय सरकारला टिश्यूसाठी अनुदान देता येत नाही. त्यामुळे टिश्युकल्चरला मान्यता देण्यासाठी विद्यापीठांशी बोलणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

सनसनाटीसाठी मीडिया काहीही करते : मिरजेवरून लातूरला रेल्वेने एक कोटी लिटर पाणी देण्यात आले. एका दिवसात ५० लाख लिटर पाणी आम्ही दिले. मात्र, मीडियाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याऐवजी हेलिपॅडवर पाणी मारले, त्याकडे मीडियाने लक्ष दिले. त्याबाबत बातम्या प्रकाशित झाल्या. सनसनाटीसाठी मीडिया काहीही करते. त्यामुळे मीडियाची चिंता वाटायला लागलीय, अशा शब्दांत खडसे यांनी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

पवारांशिवाय शेतीचा इतिहास अपूर्णच : खडसे म्हणाले, डाळिंबावरील रोग नष्ट करण्यासाठी संशोधन तंत्रज्ञानाला जोड देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना संरक्षण व सुरक्षितता हवी आहे. संशोधनप्रक्रियेला शरद पवारांनी चालना दिली. शेतकऱ्यांची पावले बळकट करण्याचे काम सरकार करीत आहे. राजकारणापलिकडे जाऊन शेतीची चर्चा होते, तेव्हा शरद पवार यांचे नाव समोर येते. शेती क्षेत्राला नवी दिशा त्यांनी दिली. त्यांनीच याचा मूळ पाया रचला. त्याला पुढे नेण्याचे काम आम्ही करीत आहोत. त्यांच्या दूरदृष्टीचे निर्णय उपयोगी ठरत आहेत. त्यांच्याशिवाय शेतीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...