आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Last Stage For The Land Aquation Of National Highway

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी जागा संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे. यापूर्वीची आवश्यक प्रक्रिया म्हणून संपादित जागा ताब्यात घेण्यासाठी महसूलने संबंधित शेतकर्‍यांना नोटीस बजावणे सुरू केले आहे. भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात तब्बल 1 हजार 516 शेतकर्‍यांना ही नोटीस बजावण्यात येणार आहे.

भुसावळ विभागातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहाचे अंतर 50 किलोमीटर आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक जागेसाठी महसूल विभागातर्फे संपादन सुरू आहे. भुसावळ आणि मुक्ताईनगर या दोन तालुक्यातील 1 हजार 516 शेतकर्‍यांची जमीन संपादनाची प्रक्रिया दोन वर्षापासून सुरू करण्यात आली होती. ही प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असून संपादित जागा शासनाच्या ताब्यात देण्याबाबत संबंधित शेतकर्‍यांना नोटीस बजावण्यात येईल. यानंतर ताब्यात घेतलेली जमीन ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ औरंगाबादकडे वर्ग करण्यात येईल. दरम्यान, जागेचा ताबा मिळवण्यासाठी महसूल विभागातर्फे संबंधित शेतकर्‍यांच्या याद्या तयार करणे सुरू आहे. भुसावळ 918 तर मुक्ताईनगर तालुक्यातील 598 शेतकर्‍यांची जमीन चौपदरीकरणासाठी संपादित होणार आहे.

*भुसावळ तालुक्यातून 517 शेतकर्‍यांनी अधिसूचनेवर घेतल्या होत्या हरकती
*मुक्ताईनगरमधील 173 शेतकर्‍यांनी घेतलेल्या हरकतींवर झाली होती सुनावणी
*ऑगस्टअखेर धनादेशाद्वारे मोबदला देण्याची सुरूवात होण्याची शक्यता
*दोन्ही बाजूंची बांधकामे, वृक्ष, फळझाडे, जलवाहिनी, विहिरी होणार इतिहासजमा

शेतकर्‍यांना धनादेश
संपादित जमिनीच्या मोबदल्यात सरकारकडून शेतकर्‍यांना गावनिहाय धनादेश वाटप होईल. यासाठी नोटीसद्वारे सूचना मिळेल. जे शेतकरी प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्या जागेचा ताबा 60 दिवसानंतर शासन घेऊ शकते. मात्र, संघर्षाची वेळ येऊ न देता, सर्वसहमतीने प्रक्रिया पूर्ण करण्यावर महसूल यंत्रणेचा भर आहे. यापूर्वी शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या सर्व हरकतींवर सुनावणी झाली. यावेळी शेतकरी वकिलांसह उपस्थित होते.

लवकरच देणार मोबदला
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जागा संपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास आहे. शेतकर्‍यांना जागेचा मोबदला देण्यासाठी लवकरच तारीख जाहीर होईल. त्यापूर्वी शेतकर्‍यांना सूचनेसाठी नोटीस पाठवणार. यानंतर धनादेशाद्वारे जागेचा मोबदला मिळेल. राहुल मुंडके, प्रांताधिकारी, भुसावळ

भुसावळ तालुक्यातील 17 गावे
काहूरखेडा (38), बोहर्डी बुद्रूक (52), बोहर्डी खुर्द (57), तळवेल (115), वरणगाव एक (58), वरणगाव दोन (45), जाडगाव (60), पिंप्रीसेकम (27), साकरी (14), फुलगाव (72), निंभोरा बुद्रूक (30), फेकरी (62), खडके (10), कंडारी (135), भुसावळ (58) आणि साकेगाव (85) असे 918 शेतकर्‍यांचे 7 लाख 26 हजार 336 चौरस मीटर क्षेत्र संपादित होईल. चौपदरीकरणात जमीन जाणार्‍या तालुक्यातील गावांची संख्या 17 आहे.


मुक्ताईनगरमधील आठ गावे
चिखली (65), घोडसगाव (124), पिंप्रीअकाराऊत (62), मुक्ताईनगर (154), सालबर्डी (37), सातोड (5), कोथळी (39), हरताळे (112) असे 598 शेतकर्‍यांचे 2 लाख 51 हजार 047 चौरस मीटर क्षेत्र चौपदरीकरणात वापरले जाईल. मुक्ताईनगर तालुक्यातील आठ गावांमधील हे क्षेत्र असेल. दरम्यान, आता पुढील प्रक्रियेची शेतकर्‍यांप्रमाणेच सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. ऑगस्टअखेर ती पूर्ण होण्याची शक्यता महसूल विभागाने व्यक्त केली.