आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत वीजधक्क्याने 49 जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पावसाळ्यात विजेचा शॉक लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत क्रॉम्प्टन व महावितरणच्या कार्यक्षेत्रात (म्हणजे शहरासह जिल्ह्यात) 49 जणांना शॉक लागण्याच्या घटनांमध्ये प्राण गमवावे लागले आहेत. यात वीज कंपनीच्या चार कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. तसेच शॉक लागून 52 प्राण्यांचाही बळी गेला आहे.

विजेचा धक्का लागण्याच्या सर्वाधिक घटना पावसाळ्यात घडल्या आहेत. वादळामुळे झाड अथवा झाडांच्या फांद्या तारांवर पडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तुटलेल्या वीजतारांना अनावधानाने स्पर्श झाल्याचे प्रकार घडतात. शहरातील चौघुले प्लॉट, राजकमल टॉकीज, रामानंदनगर या भागात अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. विजेचे खांब अथवा ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम करताना उच्चदाबाच्या वाहिनीला स्पर्श होणे, शेतात तुटलेल्या तारेला स्पर्श होणे अथवा इन्व्हर्टरच्या रिटर्न सप्लायमुळे वीज कर्मचार्‍यांनाही अपघाताचा सामना करावा लागला आहे.

विजेचा धक्का लागून अपघात झाल्यानंतर संबंधितांना भरपाई देण्यासाठी अपघाताची चौकशी केली जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षकांकडे चौकशीची जबाबदारी दिली जाते. मात्र भरपाई मिळण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने बहुतांश तक्रारदारांना नुकसानभरपाई मिळत नसल्याची स्थिती आहे. क्रॉम्प्टनने शहरात कारभार सुरू केल्यानंतर गेल्या 22 महिन्यांच्या काळात सहा जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

काळजी आवश्यक
पावसाळ्यात वीजपुरवठा दुरुस्तीचे काम करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. छोटीशी चूकदेखील दुर्घटनेचे कारण ठरू शकते. तुटलेल्या तारा, वीजप्रवाह उतरलेले खांब या विषयीची माहिती नागरिकांनी कॉलसेंटरला दिल्यास तत्काळ तक्रारींचे निवारण केले जाईल. डॉ.व्ही.पी.सोनवणे, युनिट हेड, क्रॉम्प्टन

अशी घ्या काळजी

विजा कडाडत असताना विजेची उपकरणे बंद ठेवा.

घरातील अर्थिंगची परवानाधारक कंत्राटदाराकडून तपासणी करा.

कपडे वाळवण्यासाठी वीजतारांचा वापर करू नका.

विजेचा धक्का लागलेल्या व्यक्तीस तारांपासून वाळलेल्या लाकडाने दूर करा व तत्काळ दवाखान्यात न्या.

ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नका. पाळीव प्राणी व जनावरे विद्युत खांबास बांधू नका.

तुटलेल्या तारांविषयी 2232514, 2220800 या क्रमांकावर माहिती द्या.