आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी, कुबेराच्या पूजनासह आतशबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लक्ष्मी ही संपत्तीची देवता तर कुबेर हा संपत्तीचा रक्षक आहे. दिवाळी सणात यांना पूजनाचा महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय. व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक व घरोघरी वहीचे पूजन करून फटाक्यांच्या आतशबाजीत रविवारी लक्ष्मीपूजनाचा सण साजरा झाला. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम सुरू होता.

मांगल्याच्या आणि उत्साहाच्या दिवाळी सणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दिवाळीचा तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असल्याने सकाळपासूनच पूजेचा उत्साह घरोघरी दिसून आला. अश्विन अमावस्येचा दिवस लक्ष्मीपूजनाचा असल्याने या दिवशी भगवान विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवतांना बळीच्या तुरुंगातून मुक्त केले आणि यानंतर सर्व देव क्षीरसागरात गेले, अशी आख्यायिका आहे. या आनंदप्रीत्यर्थ सर्व जण दीपोत्सव साजरा करतात. रविवारी घरोघरी, प्रतिष्ठानात व्यापारी केंद्रात लक्ष्मीचे विधीवत पूजन झाले. वृषभ स्थिर असल्याने रात्री 8.37 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता. शहरातील दाणाबाजार, नवीपेठ, चौबे मार्केट, फुले मार्केट या भागात खरेदीदारांची गर्दी असली तरी यातून वेळ काढत व्यावसायिक, व्यापार्‍यांनी वहीचे पूजन करून आपली परंपरा कायम ठेवली. सकाळी 12 वाजेपर्यंत नवीपेठ भागातील बँकांमध्येही वहीचे पूजन होऊन उत्साह व फटाक्यांची आतशबाजी झाली. व्यापारी पेढय़ांमध्ये चौघडिया मुहर्तावर म्हणजे सायंकाळी सहाच्या पुढे पूजन झाले. यावेळी राजाधिराज कुबेराचे पूजन केले जाते. लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या वेळेतच करावे, असे शास्त्रात असल्यामुळे अनेकांचा कलही ही वेळ पाळण्याकडेच होता. दाणाबाजार परिसरातही प्रत्येक दुकानामध्ये याचे पूजन सुरू होते; त्यामुळे पुरोहितांना अधिक महत्व आले होते.

व्यापार्‍यांकडून पूजन साहित्यांची खरेदी
प्रतिष्ठांनांमध्ये व्यापारी वर्ग खतावणीसाठी रोजमेळचा उपयोग करतात. संपूर्ण आर्थिक व्यवहारांची नोंद यात करण्यात येत असल्यामुळे ती प्रतिलक्ष्मी असल्यामुळे लक्ष्मी मूर्तीसोबत रोजमेळ वहीचेही पूजन केले गेले. यासह चोपड्या, लक्ष्मीचा फोटो, लाह्या, बत्ताशे, केळीची पाने, फुले, घराला लावण्यासाठी ऊस यासह कलशासोबतच पाच फळे, लक्ष्मी मूर्ती, मिठाई, साखरेचे कंगण आदी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होती.


शोभेच्या फटाक्यातून निघतो विषारी धूर
दिवाळी साजरी करण्यासाठी विविध प्रकारचे फटाके फोडण्यात सध्या बच्चे कंपनी दंग आहे. फुलझड्या, भुईनळे सुतळीबॉम्बसारखे फटाके फोडण्यापूर्वी ते आपल्या आरोग्यासाठी कसे घातक ठरतात याची माहिती पालकांनी आपल्या मुलांना देणे आवश्यक आहे. फटाके जपून फोडण्याचा सल्लाही बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

हद्दपार केलेल्या हेवी मेटल (धातू)चा वापर फुलबाज्यांमध्ये करण्यात येतो. आवाज करणार्‍या फटाक्याहून अधिक फुलझड्या पेटविणे हे आरोग्यासाठी घातक असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. फुलबाज्या कारंजे हे बॉम्बपेक्षा कमी आवाज करणारे फटाके आहेत, अशी आपली धारणा असते. पण खरे तर तेच सर्वात विषारी फटाके असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ.हेमंत पाटील यांनी सांगितले. हिरव्या सोनेरी व गुलाबी रंगाची उधळण करणार्‍या या फुलबाज्यांत लेड (शिसे)व्हॅनाडियम, कॉपर, आयर्न अँल्युमिनियम, मॅगनिज, झिंक अशा धातूंचा समावेश असतो. कॉपर, व्हॅनाडियम आणि तेही असे धातू सेवनात आले किंवा त्यांचा जरासाही संबंध आला तरी ते आरोग्यास अपायकारक ठरतात. फुलझड्यांना रंग यावा यासाठी असे धातू त्यात वापरतात. फुलझड्या उडविल्यानंतर त्यातील हे धातू धुळीच्या रूपात झाडाच्या पानांवर किंवा पृष्ठभागावर साचतात. अशा रीतीने ते बराच काळ वातावरणात राहतात. जर ते श्वासावाटे आत गेले तर श्वसनसंस्थेवर अनिष्ट परिणाम होण्यास कारणीभूत ठरतात. खास करून स्पर्शाद्वारेही ते शरीरात जातात. फुलझड्यांचा वापर करताना खास करून मुलांमध्ये हे धातू त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. ध्वनिर्मयादा ओलांडणारे फटाके किंवा अशा घातक धातूंचा समावेश असणार्‍या फुलझड्या विक्रीवर व वितरणावर प्रतिबंध घालण्याची गरज समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झाल्याचेही डॉ.हेमंत पाटील यांनी सांगितले.