आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटनेचा विरोध: बिल्डरांच्या मागे आता ‘एलबीटी’चा ससेमिरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जमिनींच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने खरेदी-विक्री व्यवसायात मंदीचे वातावरण सुरू आहे. या परिस्थितीत महापालिका हद्दीतील बांधकाम साहित्य किंवा पूर्ण झालेल्या बांधकामांवर एलबीटी आकारणी वसुलीचा ससेमिरा प्रशासनाने चालविला आहे. बांधकाम साहित्य खरेदी करतानाच विक्रेत्यांकडून एलबीटी लावली जात असताना पुन्हा त्याच कराच्या वसुलीला बांधकाम व्यावसायीकांचा विरोध होत आहे.

नवीन बांधकामासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागते. या वेळी विकास शुल्कासोबत एलबीटीसाठी प्रस्तावित रकमेच्या 50 टक्के रक्कम जमा करण्याचे निर्देश नगररचना विभागाने काढले आहेत. या संदर्भातील पत्र शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना देणे सुरू झाले आहे. यानुसार चारमजली, सातमजली इमारतींना चौरस फूटाप्रमाणे 100 ते 200 रुपये प्रतिचौरस मीटर क्षेत्राप्रमाणे पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत महापालिका स्थानिक संस्थाकर विभागात संपर्क साधून नोंदणी करण्याचे कळविण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिक संतप्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत येणार्‍या सिमेंट, आसारी, दरवाजे, हार्डवेअर अशा साहित्य विक्रेत्यांकडून एलबीटी वसूल केलेला असतो. त्यानंतर पुन्हा बांधकाम क्षेत्रानुसार एलबीटी मागण्यांना बांधकाम व्यावसायिकांचा विरोध होत आहे. बांधकाम व्यावसायिकांना घातलेल्या जाचक अटींच्या विरोधात प्रशासनाला आधी निवेदने देण्यात येणार आहेत. निवेदनांची दखल न घेतल्यास बांधकाम व्यावसायिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. एलबीटी आकारणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकाराला आमचा विरोध
बांधकाम व्यावसायिक सिमेंट, स्टील खरेदी करताना आधीच एलबीटी देत असतो. यानंतर नव्याने एलबीटी वसुलीसाठी सुरू असलेले प्रयत्न चुकीचे आहे. संघटनेचा या गोष्टीला विरोध असून या संदर्भात निर्णय घेऊन लवकरच पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
-धनंजय पोतदार, अध्यक्ष फेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन

प्लॉट खरेदी-विक्रीवर कर
जमिनीच्या खरेदीपासून पालिका विविध कर आकारते. बांधकामाचे साहित्य खरेदी करताना व्यावसायिक एलबीटी लावूनच विक्री करतात. दोन्ही ठिकाणी एलबीटी भरल्यावर पुन्हा एलबीटी वसूल करणे योग्य नाही.
-किशोर बोरोले, उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन

एलबीटी अन्यायकारक
बांधकाम व्यावसायिक रेती वगळता इतर बांधकाम साहित्य खरेदी करताना बिलात एलबीटी लावण्यात आलेली असते. आता बांधकाम क्षेत्रावर एलबीटी आकारणीचा प्रय} प्रशासनाकडून केला जात आहे. अशा पद्धतीने कर वाढवत गेल्याने सामान्यांना घर घेणे आवाक्याबाहेर गेले आहे.
-युसूफ मकरा, संचालक मकरा कन्स्ट्रक्शन

स्पष्ट निर्देश नाहीत
साहित्यावर एलबीटी भरल्यावर पुन्हा एलबीटी कशी भरावी या संदर्भात स्पष्ट निर्देश काय आहेत याची माहिती पालिकेने उपलब्ध करून दिलेली नाही. या गोष्टीचा खुलासा झाल्याशिवाय बांधकाम व्यावसायिक पालिकेला अतिरिक्त एलबीटी देणार नाही.
-गनी मेमन, बांधकाम व्यावसायिक